संग्रहित फोटो
जिल्हा परिषदेसाठी आनेवाडी गावातून योगिता फरांदे, श्वेता फरांदे, माधुरी गोरे या तीन महिलांनी भाजपकडे उमेदवारांची मागणी केली आहे. तर कुडाळमधून मोनिका बारटक्के, गीता लोखंडे यांच्यासह सर्जापूरच्या स्वागता बोराटे अशा मातब्बर महिला उमेदवारांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच वाढली आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत जयश्री गिरी यांना आरक्षण नसताना सायगाव गणातून उमेदवारी देण्यात आली होती. आता किमान ओबीसी नव्या चेहऱ्यास नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असा सूर इच्छुक ओबीसी महिला उमेदवारांमधून उमटत आहे. योग्य उमेदवार न दिल्यास पुन्हा एकदा कुडाळ गटाचा जिल्हा परिषदेचा उमेदवार पराभूत होऊ शकतो, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना योग्य उमेदवाराची निवड करावी लागणार आहे.
दीपक पवार अजूनही शांतच दिसत आहेत. मात्र शिवसेना शिंदे गटाने आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. गटातील कुडाळ गणात प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी सभापती खुर्चीवर डोळा ठेवत पुन्हा एकदा उमेदवारीसाठी ते रणांगणात उतरले आहेत. कुडाळ गावचे मतदान अधिक असल्याने त्यांना विजयाचा मार्ग सुकर वाटत आहे. मात्र कुडाळ गावातूनच त्यांच्याविरोधात एक छुपा दबाव गट तयार झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातून बाजार समितीचे चेअरमन राजेंद्र शिंदे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना शिंदे गटातून प्रशांत तरडे उमेदवार असतील.
सायगाव गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने भाजपा या ठिकाणी मोरखिंडीपलीकडील अकरा गावांमधील उमेदवार देऊ शकते. यामध्ये वर्षा जवळ, रिटकवलीच्या शारदा मर्ढेकर यांची नावे आघाडीवर आहेत.
गटाचा उमेदवार सायगाव गणातून
सायगाव गणातील आनेवाडीतून जिल्हा परिषदेचा उमेदवार दिला गेला व कुडाळ पंचायत समिती गणाचा उमेदवार कुडाळ तर सायगाव पंचायत समिती गणाचा उमेदवार हा अकरा गावांमधून दिला गेल्यास उमेदवारीचा त्रिकोण साधला जाऊन विजयाची गणिते भाजपच्या दृष्टीने सोप्पी होऊ शकतात. अशी सध्याची राजकीय परिस्थिती कुडाळ गटातील आहे.
हे सुद्धा वाचा : जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’
जयदीप शिंदेंची ऐनवेळी एन्ट्री
कुडाळ गटात गिरींच्या उमेदवारीसाठी विरोध वाढतच चालला असून, या विरोधात आता बाजार समितीचे चेअरमन व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जयदीप शिंदे यांनी देखील आपल्या पत्नीची कुणबी प्रमाणपत्राच्या जोरावर जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार एन्ट्री केली आहे.
गिरींची शिफारस करणार कोण ?
दोन टर्म सभापतीपद मिळवणाऱ्या गिरी दांपत्यास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सभापतीपद देऊन त्यांचा सन्मान राखला. मात्र लोकसभा निवडणूक व जिल्हा बँक निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना गिरींनी विरोधात काम केले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीस निष्ठवंतांकडून विरोध वाढला आहे.






