पनवेल, ग्रामीण : सेल्फी काढताना पाय घसरल्याने माची प्रबळगडावरून खाली पडल्याने 24 वर्षीय नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 28 डिसेंबर रोजी घडली आहे. शुभांगी विनायक पटेल (दत्तवाडी, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. दोघे पती पत्नी ट्रेकिंग करण्यासाठी गेले असताना सेल्फी काढताना पाय घसरून ती खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. शुभांगी आणि विनायक यांचे वीस दिवसापूर्वी लग्न झाले होते.
शुभांगी आणि तिचा पती विनायक पटेल हे दोघे लोणावळा येथे हनिमूनसाठी 28 डिसेंबर रोजी गेले होते. त्या ठिकाणाहून ते दुपारी 2 च्या सुमारास माची प्रबळ येथे ट्रेकिंगसाठी गेले. यावेळी शुभांगी सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती वरून खाली पडली. हा सर्व प्रकार विनायक याच्या डोळ्यादेखत घडला. शुभांगी अंदाजे दीड ते दोन हजार फूट खाली कोसळली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
या महिलेला तालुका पोलीस ठाण्याचे वपोनी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेडुंग चौकीचे पोलीस अंमलदार गोपीनाथ पठारे, अमर भालसिंग तसेच एपीआय अर्चना कुदळे, एपीआय सचिन पोवार, पीएसआय हर्षल रजपूत, सोनकांबळे घटनास्थळी गेले. पोलिसांच्या, स्थानिकांच्या आणि निसर्ग मित्र यांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात आले. यावेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले होते. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रात्री आठच्या सुमारास मृत घोषित केले.