File Photo : Suicide
कळमनुरी : तालुक्यातील बाभळी फाटा येथे 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना एक जुलैला रात्री उघडकीस आली. माधव उर्फ संभाजी खिल्लारे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
कळमनुरी तालुक्यातील बाभळी फाटा येथील माधव उर्फ संभाजी खिल्लारे (वय 30) हा युवक शिऊर साखर कारखान्यालगत असलेल्या एका शेतामध्ये सालगडी म्हणून वास्तव्यास होता. 1 जुलैला सायंकाळी सातच्या सुमारास बाभळी येथे आजोबाला भेटण्यासाठी म्हणून माधव उर्फ संभाजी खिल्लारे हे गेले. परंतु बराच वेळ निघून गेल्यानंतर माधव हे परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता, बाभळी येथील त्यांच्या घरी माधव यांचा दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
याबाबत माहिती कळमनुरी पोलिसांना देण्यात आली. कळमनुरी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. माधव खिल्लारे यांचा मृतदेह कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. दरम्यान या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.