पुणे : पुण्यामध्ये ललित कला केंद्राच्या (Lalit Kala Kendra) विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वादग्रस्त नाटकावरुन वादंग निर्माण झाला आहे. रामायणामधील घटनेवर आधारित ‘जब वी मेट’नाटकामध्ये (‘Jab We Met’ drama) प्रभू श्री राम (Shri Ram) व सीता माता त्यांच्या मुखी वादग्रस्त व शिवीगाळ असणारे संवाद देण्यात आले होते. यामुळे ABVP ने हे नाटक बंद पाडले. यानंतर पोलिसांनी विभागप्रमुखांसह 6 जणांवर कारवाई देखील केली आहे. यानंतर आज अभाविपने (ABVP) चतुर्शृंगी मंदिर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) मुख्य प्रवेशद्वारपर्यंत मोर्चा काढण्यात आला.
पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र यांनी नाटकाद्वारे हिंदू विरोध व हेतुपूर्वक हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे. या नाटकाविरोधामध्ये पुण्यातील हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या. त्यांनी चतुर्शृंगी मंदिर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मोर्चा काढला. यावेळी प्रभू श्री रामांचे मोठे चित्र देखील अभाविपने घेतले होते. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये अभाविपचा हा मोर्चा पार पडला. ‘बजरंगी बली की जय’ आणि ‘जय श्री राम’ अशा घोषणा देण्यात आल्या.
अभाविपचे पश्चिम विभागाचे महामंत्री अनिल ठोंबरे म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपर्यंत अनेकवेळा चुकीच्या पद्धतीने कामकाज झाले. त्या विरोधात आम्ही नेहमीच आवाज उठविण्याच काम केले आहे. तर दोन दिवसांपूर्वी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांमार्फत प्रभू श्रीराम आणि सीता माता यांच्याबद्दल जे पात्र सादर करण्यात आले त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने संवाद साधला गेला. तर या प्रकरणी संबधित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही मोर्चा काढला आहे. या आंदोलनाची दखल विद्यापीठ प्रशासनाने न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी ABVP ने दिला आहे.