नागपूर : सध्या राज्यात अपघातांची मालिका (Series of Accident) सुरु असल्याचे दिसत आहे. पुणे पोर्शे कार अपघातानंतर राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरण (Nagpur Accident) समोर आले आहे. यामध्ये भरधाव कारने पाच जणांना चिरडले. या अपघातात एका दाम्पत्यासह फळेभाज्या विक्रेताही गंभीररित्या जखमी झाला आहे.
नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत व्यंकटेशनगर चौकातील केडीके कॉलेजजवळ एक अल्पवयीन तरुण भरधाव वेगाने कार चालवत होता. याचदरम्यान त्याच्याकडील स्कोडा कार नियंत्रणाबाहेर गेली. ही कार प्रथमत: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही दुचाकींना धडकली आणि नंतर फळ-भाजी विक्रेते आणि काही पादचाऱ्यांच्या गर्दीत घुसली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्यानंतर अखेर ही कार थांबली.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यंकटेशनगर येथील रस्त्यावर भाजी मार्केट आहे. येथे बसंती, गोलू, कार्तिक यांची दुकाने आहेत. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अग्रवाल दाम्पत्य फळे व भाजीपाला घेण्यासाठी थांबले. दरम्यान, अल्पवयीन कार चालकाने प्रथम दुचाकीला धडक देऊन तिघांनाही चिरडले. अग्रवाल दाम्पत्यासह पाच जण जखमी झाले.
दरम्यान, या घटनेने भाजी विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी अल्पवयीन चालकाला गाडीतून बाहेर काढून मारहाण करण्यास सुरुवात केली.