मुंबई: खासदार संजय राऊत आणि त्यांचा भाऊ आमदार सुनील राऊत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणातील आरोपी मयूर शिंदे (Mayur Shinde) याला कांजूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मयूर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय आहे. धमकी प्रकरणात मयूर शिंदेसह एकाला कांजूरमार्ग पोलिसांनी अटक (Arrest) केली असून आरोपींना मुलुंड कोर्टामध्ये नेण्यात आलं आहे. (Mumbai News)
मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार व्यक्तींना अटक केली आहे. मुंबई पोलीसांनी ही माहिती दिली आहे. मयूर शिंदे हा संजय राऊत यांच्या जवळचा आहे. मयूर शिंदेने संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा बनाव रचला होता. मयूर शिंदेने स्वत: फोन केले नाहीत. मात्र मयूर शिंदे हा या मागचा मुख्य सूत्रधार असून आपल्या जवळच्या साथीदारांना त्याने हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
संजय राऊत यांचे बंधू आणि भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचा फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीनं हा फोन सुनील राऊतांना केला होता. सुनील राऊतांनी फोन उचलल्यानंतर सकाळी 9 वाजताचा भोंगा बंद करा, नाहीतर महिनाभरात तुम्हा दोघांनाही गोळ्या घालू,अशी थेट धमकी या अज्ञात व्यक्तीनं संजय राऊतांना आणि सुनील राऊतांना दिली.
दरम्यान, शरद पवार, संजय राऊत धमक्यांच्या सत्रानंतर सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसंच राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या प्रकरणात आता नेमकी काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.