BMC Election 2026: किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे शत्रू; भाजपचे महाराष्ट्रविरोधी मनसुबे उघड ; संजय राऊतांनी तोफ डागली
वार्ड क्रमांक 107 ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना देण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून नील सोमय्या यांच्या विरोधात ठाकरे गट पुरस्कृत उमेदवार देण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या हे केवळ आमचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे कट्टर विरोधक आहेत. ते महाराष्ट्र आणि मराठीविरोधी भूमिका घेत आले असून, महाराष्ट्राचे शत्रू आहेत. भाजपकडून अशा महाराष्ट्रविरोधी व्यक्तींना निवडणुकीच्या मैदानात उतरवले जात असल्याने पक्षाचे मनसुबे स्पष्ट झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत घेतलेल्या भूमिका सातत्याने महाराष्ट्रविरोधी राहिल्या आहेत. शालेय शिक्षणात मराठी भाषेला विरोध करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली होती. त्या संदर्भात ते उषा मेहता यांच्यासोबत न्यायालयातही गेले होते, असा दावा राऊत यांनी केला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून जागावाटपात प्रभाग क्रमांक 107 ची मागणी केली होती. प्रभाग 107 खूप संवेदनशील आहे. ती जागा आम्ही लढणे महत्त्वाचे आहे आमच्याकडे चांगले उमेदवार असल्याचे राष्ट्रवादीने सांगितले होते. आपण सगळे मिळून ती जागा जिंकू, त्यामुळे नाईलाजाने आम्ही ती जागा त्यांच्याकडे दिली. शरद पवार यांच्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे उभे राहाण्याचे आम्ही सगळ्यांनी ठरवले. पण नेहमीप्रमाणे प्रभाग क्र 107 मध्ये बिनविरोध घोटाळा झाला.
त्यानंतर मुलुंडचे नाXX पोपटलाल बिनविरोध, बिनविरोध, माझ्याविरुद्ध कोणी नाही, असे करत नाचायला लागले. पण राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडल्यानंतर आमचे शिवसैनिक दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला आहे. त्यांचा अर्ज कायम आहे. उद्धव ठाकरे यांनी दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार असल्याचे पत्र दिलं आहे. त्यामुळे आता तिथे नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होणार आहे. दिनेश जाधव यांना फक्त मशाल चिन्ह न मिळाल्याने ते ‘दूरदर्शन संच’ या चिन्हावर लढतील. या ठिकाणी काटे की टक्कर होणार आहे. नील सोमय्या बिनविरोध येऊ शकत नाही. त्यांना आमच्या शिवसेनेशी लढावेच लागणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला.






