नांदेडमध्ये शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News: सेनगाव : सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील शेतकरी यशवंत गणा काचगुंडे यांना पोलिसांकडून जबर मारहाण केल्याचा गंभीर आरोप पीडिताची आई भागुबाई काचगुंडे यांनी केला आहे. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत असून सोशल मीडियावर याच घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या संदर्भात नवराष्ट्रमध्ये 30 ऑक्टोबर रोजी सखोल बातमी देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
चौकशीसाठी विशेष समितीची केली स्थापना
शेतक-याला विनाकारण मारहाण केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात होता. त्यामुळे या प्रकाराकडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गांभीर्याने पाहिले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, “या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, दोषीवर नक्कीच कारवाई होईल. या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अहवाल प्राप्त हाताच कारवाई : कोकाटे
चौकशी अहवाल प्राप्त होताच संबंधित दोषीविरुद्ध कठोर कारवाई होणार असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे. सेनगाव पोलिसांकडून शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीची तक्रार प्राप्त झाली असून, या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान पीडित शेतकऱ्याचे आरोग्य प्रमाणपत्र, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज यांचा सखोल तपास केला जात आहे.
दोषींवर कारवाई न झाल्याने शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत
पीडित शेतकरी यशवंत काचगुंडे यांना सेनगाथ पोलिसांनी जबर मारहाण केली असून, त्यांच्यावर हिंगोली जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मारहाणीचे कारण विचारण्यासाठी ठाण्यात गेल्यावर ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी तुझं काही
होत नाही. इथून जा” अशी अपमानजनक वागणूक दिल्याचा आरोप भागुबाई काचगुंडे यांनी निवेदनात केला आहे. या तक्रारीला आठवडा उलटूनही अद्याप दोषींवर कारवाई न झाल्याने शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. “मला पोलिस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे, मला न्याय मिळेल, असे पीडित यशवंत काचगुंडे यांनी सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लवकरच घटनेची सखोल चौकशी : राजकुमार केंद्रे
अहवाल प्राप्त होताच दोषीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सेनगाव पोलिसांनी हत्ता येथील शेतकऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेची चौकशी करण्याची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे. सध्या विभागावर कामाचा व्याप असल्याने थोडा विलंब होत असला तरी येत्या दोन दिवसांत सखोल आणि पारदर्शक चौकशी करून अंतिम अहवाल वरिष्ठांकडे सादर करणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी दिली.






