बीड : राजकीय नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी होणे ही आता तशी किरकोळ बाब झाली आहे. पण राजकीय नेतेमंडळींशिवाय इतर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींनी टीका केल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. मात्र, अभिनेता सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी राजकारण्यांना टोला लगावला. ‘वृक्ष लागवडीसह इतर 70 वर्षांचा हिशोब काढला तर इंग्रजांपेक्षा आपला देश आपल्याच राजकारणी लोकांनी जास्त लुटला’, असे त्यांनी म्हटले.
सयाजी शिंदे हे बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात उपस्थित होते. या जिल्ह्यात काही ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी सयाजी शिंदे यांनी भारतात घटणाऱ्या वृक्षक्षेत्रावर आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, ‘झाड तोडणाऱ्यांना दहशत बसेल असे मजबूत कायदे केले पाहिजे. वन कायदे सुधारित झाले पाहिजे. झाड तोडणाऱ्यांना दहशत बसेल असे मजबूत कायदे असले पाहिजेत. शासकीय कर्मचारी असो वा सामान्य नागरिक वृक्षतोडीसंदर्भात कठोर कायदे करा. वृक्ष लागवडीसह इतर 70 वर्षांचा हिशोब काढला तर इंग्रजांपेक्षा आपला देश आपल्याच राजकारणी लोकांनी जास्त लुटला’.
दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी सयाजी शिंदे ओळखले जातात. सयाजी शिंदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून ठिकठिकाणी काम सुरु आहे.
अनेकांना पैसे कमवण्याचा रोग
अनेकांना खूप पैसे कमवण्याचा रोग जडलेला आहे. नोकरी व्यतिरिक्त पैसा कमवणे हा रोगच आहे. विकासाच्या नावाखाली रस्त्याच्या कडे ते शंभर-शंभर वर्षाचे वृक्ष तोडणे हे चुकीचं आहे. हे वृक्ष वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.