भाजपने औरंगजेबाचा विषय का बंद पाडला'; निर्धार शिबिरातून आदित्य ठाकरेंचा घणाघात
‘महाराष्ट्रात औरंगजेबाचा विषय भाजपने काढला आणि दंगल नागपूरमध्ये झाली. छत्रपती संभाजीनगर कुठे आणि नागपूर कुठे किती आहे बघा. सगळं अंगलट आल्यानंतर हा विषय बंद पण भाजपने पाडला. वरून केंद्रातून फोन आला की त्या कबरीला हात नाही लावायचा. त्या कबरीला संरक्षणही सरकारने दिलं आणि केंद्रात आणि भाजपचं सरकार आहे. त्या कबरीला समाधीचा म्हणून उल्लेख आणि आदर देखील भाजपने केला, असा सनसणीत टोला शिवसेना युवासेनेचे नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी केला. नाशिक जिल्ह्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांचे निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळीते बोलत होते.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, नागपूर शांतताप्रीय शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र महायुती सरकारच्या फक्त १०० दिवसांच्या काळातच नागपूरमध्ये दंगल घडली. भाजपने काल नाशिकमध्ये देखील दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. जो महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आणि पुरोगामी म्हणून ओळकला जात होता. पुढे जाणारा महाराष्ट्र होता. त्या महाराष्ट्राच्या शांत शहरांमध्ये देखील दंगली घडवल्या जात आहेत. अशा शहरांध्ये जर दंगल व्हायला लागली तर गुंतवणूकदार येतील का?. उद्योगपती राहतील का?, नोकऱ्या मिळतील? कोणीच राहणार नाही.’, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
‘मी भाजप आणि महाराष्ट्राला वेगवेगळं समजतो. निजामांनी जसं महाराष्ट्रावर आक्रमण केलं होतं तसं भाजपने आक्रमण करून महाराष्ट्राला हडपलेले आहे. पण आम्ही त्यांना आक्रमण करून देणार नाही. ती औरंगजेबाची कबर प्रतीक आहे, असं महाराष्ट्र बोलत आहे. तुमची जातपात धर्म कोणताही असो, तुमचा संघ कितीही बलाढ्य असो पण जो कोणी आमच्या महाराष्ट्रावर चालून येईल त्याला या मातीत गाढला जाईल ते हे प्रतीक आहे. पण ते प्रतीक देखील पुसून टाकण्याचा डाव आहे. भाजपला महाराष्ट्राची स्वराज्याची शौर्यगाथा पुसून टाकायची आहे.’
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐकरी उल्लेख देखील भाजपच करत आहे. कोरटकर, सोलापूरकर, कोश्यारी, गृहमंत्री कोणाचे आहेत. सर्व भाजपचे आहेत. हे सर्व महाराजांचा अपमान करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान त्याचेचं लोकं करत आहेत. समृद्ध महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम भाजप करत आहे. शेतकरी जातपात बघत नव्हते. पण समाजामध्ये वाद निर्माण करून जातीपातीमध्ये भांडणं लावणारा पक्ष भाजप आहे. शेतकरी, महिला तरुण धर्म कधी बघत नव्हते. त्यांना नोकऱ्या, अन्न-वस्त्र निवारा पाहिजे. पण आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा आमच्यामध्ये फळी निर्माण करण्याचा, विष कालवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. तर तुम्हीच विचार करा आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे?’, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.