सौजन्य - सोशल मिडीया
मेढा/ दत्तात्रय पवार : पक्ष फोडाफोडी नंतर प्रथमच ही निवडणूक होत असल्याने या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी विरोधकांमध्ये प्रचाराचे अनेक मुद्दे गाजलेले पाहायला मिळाले या मुद्द्यांनी ग्रामीण भाग अगदी दुमदुमून निघाला अशात विधानसभा निवडणुकीच्या काळात गावागावातील व्हॉट्सअॅप ग्रुपसह सोशल मीडियाच्या माध्यमामधून सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांची बाजू मांडत जवळपास पंधरा दिवस जोरदार प्रचार केला. गावातील विविध मुद्दे घेऊन एकमेकांवर शाब्दिक वॉर केले. इतकेच नव्हे तर हा वाद काही ठिकाणी कधीकधी शिवीगाळीपर्यंत विकोपाला देखील गेला गेला. मात्र, निवडणूक प्रक्रिया पार पडताच ‘झाले इलेक्शन, आता जपा रिलेशन..!’ असे प्रेमाचे संदेश ग्रुपवर फिरू लागल्याने एकमेकांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचा गोडवा निर्माण होऊ लागला आहे.
निवडणुका जाहीर झाल्यापासून सातारा जिल्ह्यात सर्वपक्षीय समर्थकांना मोठा जोर चढला होता. आपल्या नेत्याचे कौतुक करण्यापासून विरोधी नेत्याचे जमेल तसे वाभाडे काढण्यापर्यंत सगळे प्रकार निवडणूक प्रचार काळात झाले. असे प्रकार ग्रामीण भागात जास्त पाहायला मिळाले. जणू कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. अनेकांनी येथील स्थानिक प्रश्नांवर बोट ठेवून नेत्यांच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला. अनेकांनी सिंचनाचा प्रश्न महागाई, आरक्षणाचा प्रश्न लाडकी बहीणवरून कांद्याचे बाजारभाव असे अनेक प्रश्न उपस्थित केले. तर अनेकांनी दहशत, गुंडगिरी, महिलांची सुरक्षितता खुंटलेला विकास, पक्ष फोडाफोडीचे राजकारण खुनशी राजकारण आदींवर चर्चा केली.
एकाच गावात राहून राजकारण करणारे कार्यकर्ते गावच्या पारावर बसून अगदी राज्याचा कारभार सोशल मीडियावरून हाकत होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंतची चर्चा गावातल्या ग्रुपवर करून राज्य समृद्ध कसा होईल? काय नियोजन केले पाहिजे? कुणाला निवडून द्यावं? हे पटवून सांगत होते. अनेक ग्रुपचे सदस्य रात्री उशिरापर्यंत सक्रिय राहून पोस्टद्वारे मत मांडत होते.
निवडणुकीच्या निकालाच्या अंदाजापर्यंत ग्रुपवर चर्चा होत असताना अनेकांनी तर चक्क झालेल्या मतांची आकडेवारीसह आपला नेता किती मतांनी विजयी होणार? याचीही आकडेवारी जाहीर करून निकाल देऊन टाकला. अनेक स्थानिक नेतेमंडळी अजूनही आपापल्या नेत्याच्या विजयाची गणिते मांडताना दिसून आले मात्र, कुणाला तरी यश-अपयश पचवावे लागणार आहे. प्रचाराच्या काळात दिसलेला टीकेचा सूर, शाब्दिक वॉर आणि कडवटपणा मागे ठेवा. निवडणुका संपल्या आहेत. आता जवळच्यांशी, मित्रांशी असलेले संबंध जपा, हे सांगणारा ‘झाले इलेक्शन, आता जपा रिलेशन! हा मेसेज सर्वांना प्रेमसंबंध जपून भानावर आणणारा ठरत आहे.