राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्यातील 5 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदलीचे आदेश जारी करण्यात आले. या आदेशानुसार त्रिगुण कुलकर्णी यांची इयत्ता १० वी आणि १२ वी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिगुण कुलकर्णी हे सध्या पुण्यातील सनदी अधिकाऱ्यांसाठीची प्रशिक्षण संस्था असलेल्या यशदाच्या उपमहासंचालक पदावर कार्यरत होते.
राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर, अंजली रमेश अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली. यात राहुल रंजन महिवाल यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. तर प्रकाश खपले यांची आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळ, मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे.
हेदेखील वाचा : IPS अधिकारी उमेश गणपत खंडबहाले! बारावीत झाला नापास पण जिद्दीने केलं स्वप्न साकार
याशिवाय, डॉ. मंजिरी मानोलकर व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्रिगुण कुलकर्णी उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची अध्यक्ष, एसएससी आणि एचएससी बोर्ड, पुणे येथे नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या सीईओ यांची बदली
हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांची मृदा आणि जलसंधारण आयुक्तपदी (छत्रपती संभाजीनगर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
चार महिन्यांपूर्वीही झाल्या होत्या बदल्या
यापूर्वी, राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या सहा-सात महिन्यांपासून अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू होत्या. यामध्ये एम.एम. सूर्यवंशी यांना वसई-विरार महानगरपालिकेत महानगरपालिका आयुक्तपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे, तर दीपा मुधोळ-मुंडे यांना पुण्यात समाज कल्याण आयुक्तपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.






