सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : मोशी कचरा डेपो येथे झालेली दुर्घटना ही पूर्णपणे मानवनिर्मित असून, महापालिका प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणामुळे नऊ कामगारांना जीव गमवावा लागला. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
रविवारी (१३ जुलै) अंधारे यांनी दुर्घटनेतील जखमी कामगार आणि मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शहरप्रमुख चेतन पवार उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या की, ५ जून रोजी याच प्रकल्पातील चिमणी कोसळण्याची घटना घडली होती. त्यावेळी प्रशासनाने त्या घटनेची गंभीर दखल घेऊन सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने अखेर मोठी दुर्घटना घडली. डेपो परिसरातील खदानीतील स्फोटांचा कचऱ्याच्या ढिगावर परिणाम होत आहे का, याचाही अभ्यास करण्यात आला नाही.
त्यांनी पुढे आरोप केला की, तळमजल्याची परवानगी असताना दोन मजली इमारत उभारण्यात आली. या इमारतीभोवती आवश्यक सुरक्षा भिंतही नव्हती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. दुर्घटनेतील सर्व कामगारांना न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरू राहील आणि दोषींना न्यायालयात खेचले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अंधारे यांनी महापालिका प्रशासनावर टीका करत, आयुक्त आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी दुर्घटनेबाबत मौन बाळगत असल्याचा आरोप केला. अनधिकृत बांधकाम आणि डेपोतील कथित गैरप्रकारांबाबत प्रशासन स्पष्ट भूमिका का घेत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राजकीय टीका करताना त्यांनी काही नेत्यांचे हिंदुत्व हे “सिझनेबल” असल्याचा टोला लगावला. निवडणुका नसल्यामुळे काही नेते घटनास्थळी फिरकले नाहीत, असा अप्रत्यक्ष निशाणा त्यांनी स्थानिक नेतृत्वावर साधला. दरम्यान, राज्यातील सध्याच्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाची उणीव जाणवत असल्याचे सांगत, “अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.






