 
        
        फोटो सौजन्य: iStock
राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतनवाढीसाठी गठित त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचे स्वागत करत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना शनिवारपासून (१ नोव्हेंबर) पासून ही १० टक्के वेतनवाढ लागू करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी जाहीर केले.
दिवाळी सणाचे औचित्य साधत कारखाना व संलग्न उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळ व स्नेहभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना आ. काळे यांनी ही आनंदवार्ता दिली.
सुविधा तर आहेत पण वापरकर्ते नाहीत; बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांवरील क्यूआर कोडला प्रतिसादाची प्रतिक्षा
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना जसा ऊसदराच्या बाबतीत संवेदनशील आहे, तसाच कर्मचाऱ्यांच्या हिताचाही विचार करतो. त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या अंतिम निर्णयानुसार, राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांसाठी १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९ या पाच वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने १४ ऑक्टोबर रोजी या संदर्भातील परिपत्रक जारी करून सर्व कारखान्यांना अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कर्मवीर काळे साखर कारखान्याने वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
“कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना हा विकासरथ आहे, ज्याची दोन चाके म्हणजे ऊसउत्पादक शेतकरी आणि कर्मचारी. सभासदांच्या घामातून आणि कर्मचाऱ्यांच्या श्रमातून तयार होणारी गोड साखर म्हणजे या परिश्रमाचे प्रतीक आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय हा त्यांच्या मेहनत, समर्पण आणि निष्ठेचा सन्मान आहे,” असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
या निर्णयाचे कोपरगाव तालुका साखर कामगार सभेचे पदाधिकारी तसेच कारखान्याचे सर्व कर्मचारी यांनी स्वागत केले. त्यांनी कारखान्याचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे आणि चेअरमन आमदार आशुतोष काळे यांचे मनःपूर्वक आभार मानले.






