आमच्या घामाचा पैसा परत द्या! सेनापती बापट मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचा पारनेरमध्ये जनआक्रोश
पारनेर तालुक्यातील सहकारात नावाजलेली सेनापती बापट मल्टीस्टेटमधील ठेवीदारांनी आम्हाला आमच्या घामाचा पैसा परत द्या, असा आक्रोश करीत आमचा पैसा न दिल्यास साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पारनेर तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेट मध्ये आपले कष्टाचे पैसे गुंतवलेले हजारो ठेवीदार आज रस्त्यावर उतरले आहे.
पारनेर बाजार तळावर झालेल्या आंदोलनातील गर्दी आणि लोकांच्या डोळ्यांतील पाणी, हे केवळ आर्थिक नुकसान नसून, एका मोठ्या विश्वासाचा झालेला अंत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी, कष्टकरी आणि निवृत्तीवेतनधारकांचा एकच सूर होता.
आम्ही पतसंस्थेचे आकडे बघून नाही, तर माजी आमदार विजयराव औटी यांच्या नावावर आणि शब्दावर विश्वास ठेवून आमची आयुष्यभराची पुंजी इथे ठेवली होती. आज दोन वर्षे उलटूनही जेव्हा हक्काचे पैसे मिळत नाहीत, तेव्हा या सामान्य माणसाने कुणाकडे पाहायचे? छोटे व्यापारी, सरकारी नोकरदार आणि ज्यांच्या संसाराची गाडी व्याजावर चालत होती, अशा वृद्धांचे हाल आज बघवत नाहीत. ज्या विश्वासाने आम्ही पैसे ठेवले, त्याच विश्वासाने आता साहेबांनी पुढाकार घेऊन आमचे पैसे मिळवून द्यावेत, ही माफक अपेक्षा या आंदोलकांच्या शब्दाशब्दांतून जाणवत होती.
Ahilyanagar News: दोन सत्रांतील सफाईला नकार, बेमुदत आंदोलनाचा युनियनचा इशारा
आंदोलनाचे नेतृत्व करणारे राजू औटी यांनी ठेवीदारांच्या भावनांना वाट करून दिली. गेल्या दोन वर्षांपासून केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीही मिळाले नसल्याने, आता ठेवीदारांचा संयम सुटला आहे. आता केवळ तोंडी चर्चा नाही, तर खासदार, आमदार, पालकमंत्री आणि थेट दिल्लीपर्यंत लेखी निवेदने दिली जाणार आहेत.
पारनेर निबंधक कार्यालयासमोर लवकरच साखळी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल, कोणाचे मुलीचे लग्न थांबले आहे, तर कोणाच्या औषधोपचाराचा प्रश्न आहे. हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर हजारो कुटुंबांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. गोरगरीब जनतेचा पैसा हा त्यांच्या रक्तापाण्याचे फळ आहे.
प्रशासनाने आणि संस्थेच्या धुरिणांनी या आक्रोशाची दखल वेळेत घेणे गरजेचे आहे. अन्यथा, हा संताप आगामी काळात मोठ्या जनआंदोलनाचे रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. ‘आमच्या ठेवी आम्हाला मिळाव्यात’ ही एकच मागणी घेऊन पारनेरचा सामान्य माणूस आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.






