फोटो सौजन्य - Social Media
महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवून त्यांच्या प्रलंबित समस्या तात्काळ सोडविणे हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
वाशिम तालुक्यातील अनसिंग तसेच मंगरुळपीर तालुक्यातील आगरगाव येथे शनिवारी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये प्रत्येक महसूल मंडळात अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यात सर्व ठिकाणी या अभियानाचा एकाच दिवशी शुभारंभ करण्यात आला. नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
जिल्ह्यातील शुभारंभाच्या दिवशी विविध महसूल प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये फेरफार २६५, ७/१२ दुरुस्ती १५०, जिल्हा सातबारा ४५६, ६-बी उतारे ४५४, विविध प्रमाणपत्रे ८८८ तसेच फेरफार नोंदी व्यवस्थापनांतर्गत ३४२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. महसूल विभागाकडून नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देत त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, या अभियानामुळे प्रलंबित महसूल प्रकरणांच्या निकाली काढण्यास गती मिळणार आहे. नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व उतारे सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरांमध्ये सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात आणि शासनाच्या सेवांचा लाभ घ्यावा.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशालम युग, उपविभागीय अधिकारी अमोल देवकर, तसेच सर्व तहसीलदारांना विशेष निर्देश देण्यात आले. गाव दप्तर अद्ययावत ठेवण्यासह प्रलंबित प्रकरणे कमी करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविणे, प्रलंबित प्रकरणे कमी करणे आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणे या उद्देशाने हे अभियान १५ मार्चपर्यंत जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.






