बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : त्यांनी अनेक वेळा राजकीय भूमिका बदलली, स्व. यशवंतराव चव्हाण यांचे देखील त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे त्यांनी केली की स्ट्रॅटेजी व मी केली की गद्दारी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावत, मला जे आतापर्यंत मिळालं ते कामातून मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सणसर (ता इंदापूर) येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त गुरुवारी (दि.2) अजित पवार यांच्या जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, मोहोळचे आमदार यशवंत माने, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील संचालक ऍड. रणजीत निंबाळकर, सरपंच पार्थ निंबाळकर यांच्यासह महायुतीतील घटकपक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, विकासाच्या दृष्टिकोनातून आपण राजकीय भूमिका बदलली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा ताकतीचा नेता या देशात दुसरा कोणी नाही. सर्व घटकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे देश पाहतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिल्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणावर कामे केली आहेत. पालखी महामार्गामुळे या परिसराचा विकास झपाट्याने होणार आहे. भविष्यातील शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची आवश्यकता आहे.
१९८७ पासून ते २०२३ पर्यंत शरद पवार यांचाच आदेश मानत आलो आहे. माझ्या आजी-आजोबांनी सांगितलं होतं. आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं. आमचे सर्वात थोरले काका स्व. वसंतराव पवार हे निवडणुकीला उभा राहिले होते, त्यावेळी संपूर्ण पवार कुटुंब वसंतराव पवार यांच्याबरोबर होते. त्यावेळी शरद पवार विद्यार्थी दशेत होते. साहेब एकटे विरोधात होते, याची सुरुवात त्यावेळी झाली ही काय?, नवीन सुरुवात नाही.
त्यानंतर वसंतराव काकांचं निधन झालं. शरद पवार १९६७ ला निवडणुकीला उभा राहिले. त्यावेळी त्यांना यशवंतराव चव्हाण यांनी संधी दिली. मला शरद पवारांनी संधी दिली. शरद पवारांना यशवंतराव चव्हाण यांनी संधी दिली. १९७२ ला शरद पवार राज्यमंत्री झाले. १९७५ ला मंत्री झाले.