माळेगावच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली,अजित पवारांचा गौप्यस्फोट(संग्रहित फोटो)
कोल्हापूर : महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर निधीचे कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यासंदर्भात सातत्याने विरोधकांकडून टीका होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकले. त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं ? मी दिलं आहे का ? मी तरी दिलेलं नाही, असं म्हणत एक प्रकारे या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये रोज असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आलं होतं.
दरम्यान, लाडकी बहीण हप्त्याच्या संदर्भाने अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की लाडक्या बहिणी योजनेचं आम्ही नियोजन केलं आहे. आदिती तटकरे यांनी सांगितल्यानंतर तातडीने नियोजन केलं असून सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, पालकमंत्रीपदावरून बोलताना अजित पवार यांनी काही अडलं आहे का ? अशी विचारणा केली. ते म्हणाले की रायगडला पालकमंत्रीपद दिलं नाही म्हणून काही अडलं आहे का? सर्व कामे होत आहेत, कोण काय बोललं याबद्दल मला विचारू नका, असं म्हणत त्यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला.