सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी उर्ज दाखल करण्याचा दिवस होता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद लावलेली असतानाच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आता काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवला आहे, त्यामुळे बारामतीमधील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बुहजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड. आकाश विजयराव मोरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, कार्याध्यक्ष लहू अण्णा निवंगुने, बारामती शहर काँग्रेस अध्यक्ष अशोक इंगुले, सरचिटणीस राहुल वाबळे, कमलाकर सातव, गोविंद मिरगे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वीरधवल गाडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोपणे, नगरसेवक अमोल सातकर, यांच्यासह काँग्रेस, रासप व वंचित आघाडीचे पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष निवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस पक्ष निवडणूक लढवेल अशी भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. त्यानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा केली होती. राष्ट्रीय समाज पक्षाने या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीही काँग्रेससोबत आहे. काँग्रेस पक्षाने लढा लोकशाहीचा, मार्ग संविधानाचा या तत्वाने या पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. ते व्यवसायाने वकील असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत. त्यांचे वडील विजयराव मोरे हे काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार होते.
हे सुद्धा वाचा : दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही! सुनेत्रा पवारांनी दिलं बारामतीकरांना वचन
पार्थ पवारांनी साधला निशाणा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पार्थ पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, “माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काँग्रेसला (त्यांना) कळायला पाहिजे काय करायचं ते. त्यांच्या (काँग्रेसच्या) राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला नाही माहिती. सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे काय चाललंय. त्यांनी (काँग्रेसने) विचार केला असेल तर करु द्या. पण त्यांना (काँग्रेसला) नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल,” अशा शब्दांत पार्थ पवार यांनी त्यांचा रोष स्पष्ट शब्दांत व्यक्त केला.






