Akhil Bhartiy Marathi sahitya Sanmelan: अमेरिकेच्या खासदारांना साहित्य संमेलनाची भुरळ; श्रीनिवास ठाणेदारांचं मराठीशी खास नातं
Akhil Bhartiy Marathi sahitya Sanmelan: स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : अमेरिकेत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या परंतु मराठी मातीशी, भाषेशी आणि संस्कृतीशी असणारी आपली नाळ तुटू न देणाऱ्या मराठमोळ्या अमेरिकन खासदारांनाही साहित्य संमेलनाची भुरळ पडली. संमेलनाच्या ग्रंथदिंडीपासून प्रत्येक कार्यक्रमात ते उत्साहाने सहभागी झाले असून साहित्य संमेलनाचा ते मनसोक्त आनंद घेत आहेत. मराठीशी आपले घट्ट नाते जपलेले हे खासदार म्हणजे श्रीनिवास ठाणेदार.
श्रीनिवास ठाणेदार हे अमेरिकेत अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ते ख्यातनाम उद्योजक आहेत. अमेरिकेत ते खासदार म्हणून कार्यरत असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी ते नियमित संपर्कात असतात. त्यांनी ही ‘श्रीची इच्छा’ हे पुस्तक काही वर्षांपूर्वी लिहिले असून ते विलक्षण लोकप्रिय ठरले होते. त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. त्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व चढ उतार अगदी प्रांजळपणाने मांडले होते. त्या पुस्तकामुळे साहित्यिक म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख प्रस्थापित झाली. संमेलनाची ग्रंथदिंडी व शोभायात्रेत ते उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांनी ग्रंथदिंडीची पालखी आपल्या खांद्यावरही घेतली. संमेलनाच्या उद्घाटनापासून सर्वच कार्यक्रमांत त्यांचा उत्साही संचार आहे.
या निमित्ताने संवाद साधताना ते म्हणाले. मी साताऱ्यात यापूर्वी येऊन गेलो आहे. अनेक वर्षांनी पुन्हा येऊन मला आनंद झाला. मी साहित्यिक आहे, उद्योजक आहे, अमेरिकेत खासदारसुद्धा आहे. मराठी साहित्यप्रेमी वाचकांची भेट घेण्यासाठी मी खास आलो आहे. माझे ‘वॉशिंग्टन डायरी’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित कऱण्यात आले आहे. माझ्या आजवरच्या राजकीय प्रवासाचा आलेख मी यात मांडला आहे.
Pune Crime: पुणे मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत खळबळ! ३० पानी सुसाईड नोट लिहून ५६ वर्षीय व्यक्तीची
ठाणेदार पुढे म्हणाले, मी चांगलं मराठी बोलतो, लिहितो याचा मला अभिमान आहे. मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो, गरीब घरातून वर आलो आणि अमेरिकेत उद्योजक झालो. तरीही मी संस्कृती आणि भाषा दोन्ही सोडलेली नाही. आपण सर्वांनीच शक्य तिथे मराठीतच बोलले पाहिजे. मराठी ही समृद्ध भाषा आहे. आपल्या संस्कृतीचा आधार आहे. आपल्या मुलांना जपायला हवे. त्यांना मराठीतून वाचायला प्रवृत्त करायला हवे. मराठीची समृद्धता जपायला हवी.






