अकोला ४५ अंशांवर; पुढे ७ दिवस हीटवेव्ह (फोटो - istock)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. तापमानाचा पारा वाढत आहे. त्यातच आठवडाभरापासून अकोल्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी हे तापमान ४७ अंशांच्या जवळपास पोहोचले होते. मंगळवारी अकोल्याचे तापमान ४५.२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. त्यामुळे आगामी काळात अकोल्याचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यात उष्णता वाढत आहे. उष्णतेच्या लाटेत संपूर्ण विदर्भ होरपळून निघत आहे. रविवारी तर विदर्भात सूर्य कोपला की काय, असेच चित्र पाहायला मिळाले. विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. देशातील सर्वाधिक तापमान अकोला शहरात ४६.९ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले असून, हे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान आहे. अकोल्यापाठोपाठ नोंदवलेल्या शहरांमध्ये अमरावतीचा दुसरा क्रमांक आहे. अमरावतीमध्ये ४६.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.
दरम्यान, विदर्भात गेल्या आठवडाभरापासून उष्णतेची लाट सुरू आहे. सातत्याने देशातील सर्वाधिक तापमान अकोला आणि विदर्भातील काही प्रमुख शहरामध्ये नोंदवले जात आहे. रविवारी तर या उन्हाळ्यातील तापमानाचा उच्चांक गाठला गेला. सोमवारी अकोल्याचे तापमान ४६.३ तर मंगळवारी ४५.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
राज्यभर उष्णतेचा पारा वाढतोय
राज्यभर उष्णतेचा पारा प्रचंड वाढताना दिसत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच बसत आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, रविवारी अकोला येथे ४६.९ अंश तापमानाची नोंद झाली, जे राज्यातील सर्वांत उष्ण ठिकाण ठरले. भंडारा ४४.०, गोंदिया ४४.४, गडचिरोली ४४.६, ब्रह्मपुरी ४४.२ आणि वाशिम ४४.६ येथेही तीव्र उष्णतेचा परिणाम जाणवला.
धाराशिवमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
दुसरीकडे, धाराशिव तालुक्यात मंगळवारी (दि.२१) दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत भयंकर वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाचा तडाखा दिला. धारूर, केशेगाव, कोल्हेगाव आदी परिसरात या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विठ्ठलवाडी येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






