File Photo : Prakash Ambedkar
अकोला : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करत महाविकास आघाडीची स्थापन केली होती. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने ‘एकला चलो रे…’ची भूमिका स्वीकारली आहे. असे असताना आता आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडी तोडली, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.
हेदेखील वाचा : बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधील असणारे मतभेद आता दूर होणार? बच्चू कडूंचं ‘ते’ विधान चर्चेत
आगामी महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. त्यावर आता विविध पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आता महाविकास आघाडी तोडण्याचा निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आल्याचे म्हटले आहे.
आंबेडकर यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. मात्र, आदित्य ठाकरेंचा नेमका वैयक्तिक फायदा काय हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. संजय राऊत यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर आघाडीचे अस्तित्व आता किती राहणार यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकसभा, विधानसभा आघाडीने लढल्या एकत्र
लोकसभा, विधानसभा आघाडीने एकत्र लढल्या होत्या. लोकसभेत आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र, विधानसभेत महाविकास आघाडीचे पानिपत झाले. आता महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेना ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार आहे. महाविकास आघाडी तोडण्याचा निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
आता तर आघाडीचा पार इस्कोट
किमान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र येईल, अशी आशा होती. तीन प्रमुख पक्षांव्यतिरिक्त समाजवादी पार्टी आदी मित्रपक्षांनाही सोबत घेऊन ही निवडणूक लढता येईल, असे काही नेत्यांना वाटत होते. मात्र, विधानसभेनंतर आघाडीत फटाके फुटायला सुरुवात झाली. आता तर आघाडीचा पार इस्कोट झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
आम्ही त्यांना थांबवणारे कोण? : जितेंद्र आव्हाड
आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याप्रकरणी ठाकरे गटावर अप्रत्यक्षपणे निशाण साधला आहे. ठाकरे गटाचे स्वबळावर जाण्याची इच्छा असेल तर त्यांना आम्ही थांबवणारे कोण? पण विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीने एकजूट राहण्याची गरज होती, असे मला वाटते.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : या महिन्यात वाजणार महापालिका निवडणुकांचं बिगुल? कामाला लागण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना