प्रशासनाचा मनमानी कारभार! अकोला तहसील अंतर्गत १५ गावांचे तलाठी कार्यालय स्थलांतर (Photo Credit - X)
त्रास, खर्च आणि वेळेचा अपव्यय
तलाठी कार्यालय गावापासून अनेक किलोमीटर अंतरावर हलविल्यामुळे शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाची कामे करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयात जाण्यासाठी वाढलेला वेळ, वाहतुकीचा अतिरिक्त खर्च आणि कामांसाठी लागणारा विलंब यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तलाठी कार्यालय स्थलांतराचा निर्णय कोणतीही पूर्वसूचना, चर्चा किंवा पर्यायी व्यवस्था न करता घेण्यात आला. हा महसूल विभागाचा निष्काळजीपणा असल्याची भावना बळावली आहे.
अधिकारी वेळेवर भेटत नाहीत!
या गैरसोयीत भर म्हणजे, स्थलांतरित कार्यालयात विविध कामांसाठी गेलेल्या नागरिकांना मंडळ अधिकारी तसेच तलाठी वेळेवर भेटत नाहीत, अशी अनेकांनी तक्रार केली आहे. तासन्तास प्रतीक्षा करूनही अधिकारी अनुपस्थित राहणे आणि कागदपत्रांची तपासणी विलंबाने होणे यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
सदरहू तलाठी कार्यालय पूर्वी ज्या ठिकाणी होते, त्याच ठिकाणी पूर्ववत सुरू ठेवावे, अशी शेतकरी बांधव आणि गावकऱ्यांची ठाम मागणी जोर धरत आहे. जुने कार्यालयाचे ठिकाण सहज उपलब्ध असल्यामुळे सर्वांनाच सोयीचे होते, त्यामुळे प्रशासनाने कार्यालये पुन्हा गावात आणावीत. शासनाने या गंभीर प्रश्नाची त्वरित दखल न घेतल्यास गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी आणि महसूल विभागाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ग्रामस्थांना दिलासा देणारा तत्काळ निर्णय घ्यावा, अशी सर्वस्तरीय मागणी वाढत आहे.
हे देखील वाचा: Illegal Water Connection : हजारो नळ कनेक्शन अनधिकृत, कोट्यवधी रुपयांचा जलकर थकीत






