धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू (संग्रहित फोटो)
अकोला : बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैलपाडा रेल्वे गेटजवळ लोहमार्गावर एका 38 वर्षीय प्रवासी तरुणाचा धावत्या रेल्वेतून कोसळून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १२) मध्यरात्री दोनच्या सुमारास उघडकीस आली. बोरगाव मंजू पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत काटेपूर्णा ते बोरगाव मंजू दरम्यान लोहमार्गावर पैलपाडा रेल्वे गेटनजीक नागपूरकडून जाणारी हावडा रेल्वे गाडी क्रमांक १२८३४ या धावत्या रेल्वेतून कोसळून एका 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती रेल्वे कर्मचारी यांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक अनिल गोपाल यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रवींद्र धुळे, हेड कॉन्स्टेबल प्रमोद गोपनारायण, अनिल आंबिलकरसह पोलिसांनी धाव घेतली.
या घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा केला असता रेल्वे प्रवासाचे टिकट मिळून आले. दरम्यान, सदर तरुण रेल्वेतून कोसळून गंभीर जखमी झाल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. तरुणाची ओळख पटेल असे घटनास्थळी काही आढळून आले नाही. दरम्यान, सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे शासकीय रुग्णालयात दाखल केला.
मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान
सदर अनोळखी मृत व्यक्तीशी ओळख किंवा कुणाचा नातेवाईक असेल तर बोरगाव मंजू पोलिस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास ठाणेदार गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक धलेमह पोलिस करत आहेत.
मीठगवाणे येथील अपघातात सात महिला गंभीर
दुसऱ्या एका घटनेत, मीठगवाणे येथील सागरी महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यापैकी एक महिलेचा मृत्यू झाला आहे. वाघ्रण येथून बागकामासाठी जानशी पठार दिशेने महिलांना घेऊन निघालेला टेम्पो समोरून जात असलेल्या लक्झरी बसला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला. तेव्हा हा अपघात झाल्याची माहिती दिली जात आहे.