सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा, अमित देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा, अमित देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई- राज्यात भाजपच्या काही नेत्यांकडून सातत्याने सामाजिक सलोखा बिघडवणारी वक्तव्ये केली जात असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. सामाजिक सलोखा जपणारे राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अशा प्रक्षोभक वक्तव्यांमुळे ढवळून निघाले आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार अमित देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशमुख यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या समाजविघातक व्यक्तींचा निषेध करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. देशमुख यांनी आपल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला आहे.
गांधी जयंतीचे निमित्त साधून देशमुख यांनी हे पत्र मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिले असून ते ‘एक्स’वर शेअर केले आहे. त्यांनी आपल्या पत्रात राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवले आहे. उज्वल परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्रात सध्या काही राजकीय तसेच काही धार्मिक नेत्यांची सावर्जनिक वक्तव्ये ही दुसऱ्या धर्माचा आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचा अवमान करणारी आहेत. त्यांच्या अशा भडकावू आणि विद्वेषक वक्तव्यांमुळे वर्षानुवर्षे एकोप्यात सांधलेली आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांची मने दुंभगण्याची भीती निर्माण झाली आहे. गोष्टी तोडायला फार कष्ट पडत नाहीत मात्र तुटलेल्या गोष्टी जोडायला प्रचंड कष्ट पडतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
आज २ ऑक्टोबर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांनी आपलं उभं आयुष्य अहिंसा, सत्य, सेवा या मूल्यांसाठी वेचलं. आज देशात आणि महाराष्ट्रात जाती आणि धर्मात द्वेष पसरवण्याचं काम होत आहे, हे थांबावं यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या पत्राद्वारे विनंती करत… pic.twitter.com/BFXzJ7pd5A
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) October 2, 2024
गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि शिवसेनेतील काही नेते प्रक्षोभक वक्तव्ये करत आहेत. त्यांचा थेट उल्लेख देशमुख यांनी आपल्या पत्रात केलेला नाही. परंतु, अशा वक्तव्यांवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनाही टॅग केले आहे.
देशमुख यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटलं की, महात्मा गांधी यांनी आपलं उभं आयुष्य अंहिसा, सत्य, सेवा या मूल्यांसाठी वेचलं. त्यांनी याच मुल्यांच्या जोरावर भारतीय स्वातंत्र्याचा लढा उभारला. त्यातून विविधतेमुळे एकमेकांपासून दुरावलेला आपला भारतीय समाज त्यांच्या नेतृत्त्वात ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात एकवटला आणि सर्व जातीधर्माच्या भारतीयांनी एकोप्याने स्वातंत्र्य लढा उभारुन देश स्वतंत्र केला.
स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे आपला देश विविधतेमध्ये असलेली आपली एकता जपून आहे. त्याचं मूळ गांधीजींच्या विचारात आहे. अहिंसा, सत्य, सेवा ही मूल्यं देशात आजवर झालेल्या सर्वच केंद्र आणि राज्य शासनांनी आपली आदर्श मूल्य म्हणून जपली. त्यामुळेच आज जगभरात भारत देश हा महात्मा गांधीजी यांच्या विचारांचा देश म्हणून ओळखला जातो. म्हणूनच आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी त्यांच्या प्रत्येक विदेश दौऱ्यात महात्मा गांधीजी यांचे नाव आपल्या प्रत्येक भाषणात आवर्जुन घेतात.
उज्वल परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्रात सध्या काही राजकीय तसेच काही धार्मिक नेत्यांची सार्वजनिक वक्तव्ये ही दुसऱ्या धर्माचा आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचा अवमान करणारी आहेत. त्यांच्या अशा भडकावू आणि विद्वेषक वक्तव्यांमुळे वर्षानुवर्षे एकोप्यात सांधलेली आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांची मने दुंभगण्याची भीती निर्माण झाली आहे. गोष्टी तोडायला फार कष्ट पडत नाहीत. मात्र तुटलेल्या गोष्टी जोडायला प्रचंड कष्ट पडतात, असे ते पत्रात म्हणाले.
राज्यात सामाजिक, जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या समाजविघातक व्यक्तींचा निषेध करत मुख्यमंत्री शिंदे हे अशा व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.