मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी आपापल्या परीने तयारी सुरु केली आहे. त्यानुसार, उमेदवारांची यादीही जाहीर केली जात आहे. असे असताना आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले.
राज्यातील महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या याच घोषणेनंतर आता उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. ते ठाकरे गटाकडून मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे आता स्पष्ट होत आहे.
दरम्यान, अमोल कीर्तीकर हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आहेत. त्यामुळे आता जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर यांना जर उमेदवारी मिळाली, तर पिता-पुत्राची राजकीय लढाई पाहिला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.