समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात
नागपूर : समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यात आता पुन्हा एकदा या मार्गावर अपघाताची घटना समोर आली. मार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर कॉक्रीट टँकर धडकला. यात टँकरच्या क्लीनरचा मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी आहे. सतीशसिंग विजयसिंग (वय 37) असे यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रामचंद्र पाल (वय 36) असे टँकरचालकाचे नाव आहे. जखमी रामचंद्र याला उपचारासाठी एम्समध्ये भरती करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्हान रहिवासी राजनसिंग (वय 42, ट्रक क्र. एमएच-40/सीडी-5658) ट्रक घेऊन वर्धा येथून नागपूरकडे येत होता. दरम्यान, ट्रकचा टायर पंक्चर झाल्याने राजनसिंगने ट्रकला रस्त्याच्या कडेला पार्क केले. दरम्यान सतीश आणि रामचंद्र (टँकर क्र. एमएच 15/एचएच-5391) ने नागपूरकडे येत होते. रामचंद्रला झोपेची डुलकी आल्याने त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि उभ्या ट्रकला धडक दिली. यात क्लीनर सतीशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली.
दरम्यान, रामचंद्रला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यानंतर क्रेनच्या मदतीने वाहनांना रस्त्याच्या कडेला करण्यात आले. रामचंद्र याला झोपेची डुलकी आल्याने त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि उभ्या ट्रकला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.
समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात
दुसऱ्या एका अपघातात, आष्टा गावातील चॅनल क्रमांक 10 जवळ ओव्हरटेकच्या नादात भरधाव ट्रॅव्हल्सने ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 10 प्रवासी जखमी झाले. बुधवारी (दि.15) पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. संतोष राम परिहार (42, रा. येरवडा, पुणे) असे मृत ट्रॅव्हल्सचालकाचे नाव आहे. यामध्ये 10 प्रवासी जखमी झाले आहेत.
पोलिस घटनास्थळी दाखल
याच पहाटे झालेल्या अपघातामुळे एकच खळबळ उडाली होती. समृध्दी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार गौतम इंगळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. पहाटेची वेळ असल्याने ट्रॅव्हल्सचालकाला झोपेची डुलकी लागली अथवा ओव्हरटेक करण्याचा नादात हा अपघात झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे.
काचा फोडून प्रवाशांना काढले बाहेर
अपघातानंतर प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केली होती. काही प्रवाशांना काचा फोडून बसच्या बाहेर काढण्यात आले. दरम्यान, किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. तर काही प्रवाशांना पुलगाव येथे दाखल करण्यात आले आहे. या ट्रॅव्हल्समध्ये 27 प्रवासी प्रवास करत होते.