सौजन्य - सोशल मिडीया
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडून तयारी सुरु आहे. प्रभाग रचना, आरक्षण साेडत पार पडली आहे. अंतिम मतदार यादी प्रारुप यादी दुरुस्त करून जाहीर केली जाईल. त्याचवेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज विक्री सुरु केली आहे. भाजपकडून अर्ज देण्यास सुरुवात झाली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता, भाजपकडे इच्छुकांची रांग लागली आहे. अर्ज विक्रीच्या पहील्याच दिवशी भाजपच्या एरंडवणा येथील (डी. पी. राेड ) कार्यालयात इच्छुकांची गर्दी झाली हाेती. दुपारपर्यंत अडीच हजाराहून अधिक अर्ज नेले गेल्याची माहीती पक्षाच्या कार्यालयातून कळविली आहे.
भाजपकडून अर्ज घेणे आणि दाखल करण्यासाठी दाेनच दिवस मुदत दिली आहे. आज अर्ज घेणे आणि दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट हाेत असून, उमेदवार निवडताना पक्षाच्या नेत्यांना नाराजी कोणी हाेणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आजपासून अर्ज विक्रीस सुरुवात केली आहे. दहा हजार ते पाच हजार रुपये इतकी या अर्जाची किंमत आहे.
काँग्रेसची १३ डिसेंबर शेवटची तारीख
काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ९ ते १३ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. मात्र, शेवटची तारीख म्हणजे १३ डिसेंबर, सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून, नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने यापूर्वीच विविध पातळ्यांवर बैठक घेऊन प्राथमिक स्तरावर उमेदवारांची चाचणी पूर्ण केली आहे. आरक्षण जाहीर झाल्यामुळे उमेदवारीसंदर्भातील परिस्थितीही स्पष्ट झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षासमोर नाराजीनाट्य, पक्षांतर यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
ठाकरे सेनेकडे २८० जण इच्छुक
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुणे शहरातील इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटप करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांत २८० इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतल्याचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी दिली. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आली आहे. भ्रष्टाचार, अनियमित कारभार आणि जनविरोधी निर्णयांविरुद्ध रस्त्यावर उतरून लढा देणारा एकमेव पक्ष म्हणून शहरात ठाकरेंच्या शिवसेनेची ओळख निर्माण झाली आहे. अर्ज ११ डिसेंबरपर्यंत स्विकारले जाणार आहेत.
आरपीआयकडून उद्यापासून अर्जवाटप
आरपीआय पक्षाकडून १० ते १३ डिसेंबर या कालावधीत अर्ज वाटप आणि स्वीकृती प्रक्रीया राबविली जाणार आहे. पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, महायुतीसाेबत निवडणुक लढविण्याचा निर्णय पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे. या बैठकीस शहराध्यक्ष संजय साेनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, संघटन सचिव परशुराम वाडेकर आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.






