Arun Gawli (Photo Credit- X)
Arun Gawli Bail: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे तब्बल १८ वर्षांनंतर अरुण गवळी (Arun Gawali) जेलमधून बाहेर येणार आहे. मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.
जस्टीस एम. एम. सुंदरेश आणि जस्टीस एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने गवळीला जामीन मंजूर करताना दोन प्रमुख बाबी लक्षात घेतल्या. पहिली म्हणजे, गवळीने १७ वर्षे आणि तीन महिन्यांची शिक्षा पूर्ण केली आहे आणि दुसरी, त्याचे वय ७६ वर्षे आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आधारावर जामीन मंजूर केला असून, निचल्या न्यायालयाने ठरवलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार आहे.
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर #जामसंडेकर_हत्या प्रकरणात अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.#ArunGawali
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 28, 2025
कमलाकर जामसांडेकर यांची २ मार्च २००७ रोजी घाटकोपर येथील त्यांच्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी जामसांडेकर टीव्ही पाहत असताना हल्लेखोरांनी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला होता, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अरुण गवळीसह ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती, तर तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, या हत्येच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत जामसांडेकर यांनी अरुण गवळी यांच्या गटातील उमेदवार अजित राणे यांना केवळ ३६७ मतांनी हरवले होते. मुंबईतील दगडी चाळीत राहणाऱ्या अरुण गवळीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गवळी २००४ ते २००९ दरम्यान आमदारही होता. आता बीएमसी निवडणुका तोंडावर असतानाच त्याला जामीन मिळाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.