काही मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार आमने सामने असणार आहेत. त्यामुळे नेते कोणाचा प्रचार करणार याची उत्सुकता आहे.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. जागावाटपाबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी सर्वच पक्षांमध्ये आपापल्या पातळीवर योग्य जागा व उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार, यावरूनही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. अशातच भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी महायुतीतील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासंबंधी मोठे भाष्य केल आहे.
महायुतीचे घटक पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवतील, असा दावा भाजप खासदार चव्हाण यांनी केला आहे. मात्र महायुतीत अद्याप मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही असेही त्यांनी नमुद केले आहे. म्हणजेच महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत तूर्तास सस्पेन्स असणार आहे.
महायुतीतील घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. मात्र पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे महायुतीतील घटक पक्षांचे सर्व प्रमुख नेते एकत्रितपणे निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ठरवतील. त्याचप्रमाणे विधानसभेत किती जागा कोणाला मिळतील, हेही तेथील परिस्थितीवर पूर्णपणे अवलंबून आहे, ज्या पक्षाच्या विजयाची अधिक शक्यता आहे, त्या पक्षाला ती जागा मिळणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा: झारखंड मुक्ती मोर्चा सोडून भाजपमध्ये जाण्याचे कारण काय?; चंपाई सोरेन यांनी दिलं उत्तर
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीतही मुख्यमंत्री पद आणि जागा वाटपासदंर्भात मोठे मतभेद असल्याचे दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते सर्वकाही सुरळीत असल्याचा दावा करत असले तरी जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही आघाड्यांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. याचे कारण म्हणजे दोन्ही आघाड्यांमधील अनेक नेत्यांनामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसत आहे.
किमान या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन असे अनेक नेते फडणवीस यांना पुढील मुख्यमंत्री म्हणत आहेत. तर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील नेतेही आपापल्या नेत्यानेच मुख्यमंत्री व्हावे, असे बोलताना दिसत आहेत.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करावे, अशी शिवसेनेची (शिंदे गट) इच्छा आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या पक्षाच्या बैठका आणि परिषदांमध्ये अजित यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषित करणारी पोस्टर्स आणि वक्तव्ये पाहायला व ऐकायला मिळत आहेत.
हेदेखील वाचा: मैत्री पासून Hate You पर्यंत…, बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाजमध्ये वादाचे खटके
विशेष म्हणजे महाविकास आघाडीप्रमाणे भाजपमध्येही ज्याच्याकडे जास्त आमदार असतील तोच मुख्यमंत्री या सूत्रावर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. अशा स्थितीत आघाडीत सहभागी पक्ष जास्तीत जास्त आणि जिंकता येण्याजोग्या जागा मिळविण्याचा प्रयत्न करत असून त्यानुसार उमेदवारांचा शोधही सुरू झाला आहे.
भाजपमधील इच्छुकांची यादीही मोठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता विशेषत: भाजप मोठ्या सावधगिरीने उमेदवार निवडणार असल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि संख्याबळाच्या जोरावर मुख्यमंत्रीपद मिळवता येईल. अशा परिस्थितीत अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा: नबान्नाच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा, आंदोलकांनी केली दगडफेक