Attack On Female Forest Guard By Contractor Case Registered Against 3 Persons What Exactly Happened Nrdm
महिला वनरक्षकावर ठेकेदाराचा हल्ला, ३ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं ?
दौंड तालुक्यातील वरवंड येथे वनविभागाच्या वनक्षेत्रांमध्ये बेकायदा जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू होते. ते काम रोखण्यासाठी गेलेल्या महिला वनरक्षकास ठेकेदार अमोल भोईटे व इतर दोन व्यक्तींनी शिवीगाळ व धक्काबुकी करत हल्ला केल्याची घटना घडली.
पाटस : दौंड तालुक्यातील वरवंड येथे वनविभागाच्या वनक्षेत्रांमध्ये बेकायदा जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू होते. ते काम रोखण्यासाठी गेलेल्या महिला वनरक्षकास ठेकेदार अमोल भोईटे व इतर दोन व्यक्तींनी शिवीगाळ व धक्काबुकी करत हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन व्यक्तींवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल पोपटराव भोईटे (रा.पाटस ता. दौंड), ढमाले व इतर एक अनोळखी व्यक्ती (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील वरवंड वन परिमंडल कार्यक्षेत्रातील वरवंड हद्दीतील वनक्षेत्र (गट नं १९२२ ) मध्ये गुरुवारी (दि २९) वनरक्षक शितल गंगाराम मेरगळ व वनमजुर अरूण बापुराव मदने हे पेट्रोलींग करीत असताना दुपारी ३ वाजण्याच्या आसपास वनक्षेत्रांमध्ये एक जेसीबी मशीन जलवाहिनीची चारी खोदताना निदर्शनास आले. तेथे जाऊन चारीची पाहीणी केली असता त्या ठिकाणी दोन जलवाहिनी च्या चारीचे खोदकाम काम सुरू असल्याचे दिसून आले.
वनरक्षक मेरगळ यांनी काम करीत असलेल्या कामगारांना विचारणा केली असता, त्यांनी ठेकेदार अमोल भोईटे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. ठेकेदार भोईटे यांना सदर खोदकामाबाबत विचारणा केली असता, त्यांनी वरंवड गावचे जलजीवन मिशन योजना अंतर्गत पिण्याची जलवाहिनीसाठी असून काळ्या रंगाची जलवाहिनी ही वरवंड गावाची असून पांढरा रंगाची ही वाखरी ग्रामपंचायत गावची आहे, असे सांगितले.
फक्त वरवंड गावचे जलजीवन मिशन योजना अंतर्गत पिण्याची जलवाहिनीसाठी वनविभागाची रितसर परवानगी असून तुम्ही वाखरी गावाची जलवाहिनीचे काम कसे करता, त्यासाठी वाखरी गावचे जलजीवन मिशन योजनेचे काम करण्याचा वनविभागाचा परवाना आहे का ? वनविभागाची एका गावासाठी परवानगी असताना दुसऱ्या गावासाठी बेकायदा काम कसे करता ते काम थांबवा, असे सांगत जेसीबी मशीन ( क्र. एम. एच. १२ व्हि.एल. ५३७५ ) जप्त करुन दौंड वनविभागाच्या कार्यालयात घेऊन जाण्यासाठी जात असताना त्याठिकाणी ढमाले नावाचा व्यक्ती आणि ठेकेदार अमोल भोईटे यांचा भाचा आले आणि त्यांनी जेसीबी मशीन घेऊन जाण्यासाठी मज्जाव केला.
तसेच ढमाले यांनी तुम्ही मला पैसे मागितले, अशी तुमची खोटी तक्रार करतो व तुम्ही एकटे फिरता मी तुम्हाला काहीही करू शकतो, अशी धमकी दिली तसेच ठेकेदार अमोल भोईटे यांनी धक्काबुक्की करून शिवागाळ करीत जेसीबी मशीन घेऊन पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
वनरक्षक शितल मेरगळ यांनी याबाबत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने ठेकेदार अमोल भोईटे, ढमाले व ठेकेदार भोईटे यांचा भाचा यांच्या विरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण करणे शिवीगाळ व धक्काबुकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार भानुदास बंडगर हे करीत आहेत.
Web Title: Attack on female forest guard by contractor case registered against 3 persons what exactly happened nrdm