Special Session on Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणावरून आज विशेष अधिवेशन बोलावले होते. यामध्ये सरकारने मराठ्यांना 10 टक्के वेगळे आरक्षणााला मंजुरी देत मराठा समाजाला न्याय देण्याचे काम केले. अधिवेशनाच्या मसूद्यामध्ये मराठा समाजासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये व शिक्षणामध्ये 10 टक्के आरक्षण नमूद करण्यात आले होते. यानंतर अधिवेशनामध्ये एकमताने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता या निर्णयाचे ओबीसी समाजाचे नेते बबनराव तायवाडे यांनी स्वागत करीत सरकारचे आभार मानले आहेत.
आरक्षणाचा मुद्दा अनेक दिवसांपासून ऐरणीवर
मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक दिवसांपासून ऐरणीवर आलेला आहे. मराठा समाज मागासलेला असून 10 टक्के आरक्षण देण्याचा ठराव करण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. आपल्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण, सर्वेक्षण, कुणबी नोंदणी या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे अधिवेशनामध्ये म्हणाले, मराठा समाजाचा मागासलेपणा सर्वेक्षणातून समोर आला आहे.
कोणत्याही समाजाला आरक्षणाला धक्का न लावता
मराठा समाज मागासलेला आहे हे त्यातून समोर आले आहे. मी कोणत्याही एका समाजाचा विचार करु शकत नाही. पण मराठा आरक्षण देताना इतर कोणावर देखील अन्याय झालेला नाही. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले आहे.” असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेला संबोधित करताना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे. मी दिलेला शब्द पाळतो. त्यामुळेच लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. आम्ही दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही वचनाची पूर्तता केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या एकजुटीचा आणि लढ्याचा हा विजय आहे.
मराठा ऐक्याचा विजय
आजचा दिवस इच्छापूर्तीचा आहे. हा मराठा समाजाचा, मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा चिकाटीने दिलेल्या लढयाचा विजय आहे, असं सांगतानाच लाखो करोडो मराठा बांधवांनी आपल्या हक्कांसाठी लढा देताना आजवर संयम सोडलेला नाही. शिस्त मोडली नाही. याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाचे, तरुण-तरुणींचे आभार व्यक्त करतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
काहींना वाटलं वेळ मारून नेलीय
मी एका सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याचा मुलगा आहे. समाजाच्या वेदना, दुःखाची मला जाणीव आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर हे दुःख, वेदना कमी करण्यासाठी अनेक आघाड्यांवर सकारात्मक प्रयत्न केले, करत आहोत. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं तेव्हा काहींना वाटलं की एकनाथ शिंदेंनी वेळ मारून नेली. पण तसं नाही. मी शब्द दिला कि पाळतो. आचारसंहिता लागल्यावर आरक्षणाचा निर्णय कसा घेणार? असा सवालही केला गेला. पण आम्ही आरक्षण देत आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.