फोटो - सोशल मिडिया
बदलापूर येथे एका शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचाराची घटना घडली आहे. याबाबर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेमुळे नागरिकांनी सकाळपासून बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दरम्यान आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य असून, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन पोलिसांकडून व मंत्री गिरीश महाजन यांनी केले. अंतर आंदोलक ऐकण्यास तयार नसल्याने अखेर १२ तासांनी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश आले आहे.
बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे घाणेरडे कृत्य केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्या नराधमाला फाशी द्या आणि आजच्या आजच फाशी द्यावी यासाठी सकाळपासून आंदोलकांनी रेल्वे स्थानकात आंदोलन सुरू केले. सकाळपासून बदलापूरकडे येणाऱ्या व जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडकल्या होत्या. अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला होता.
दरम्यान, आज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यात यश आले आहे. दरम्यान यावेळी आंदोलकांकडून देखील पोलिसांवर दगडफेक करण्यात आले. यात काही पोलीस जखमी देखील झाले आहेत. मात्र पोलिसांनी सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. रेल्वे ट्रॅकवरून पोलिसांनी आंदोलकांना पांगवले असले तरी देखील आजूबाजूच्या परिसरातून हे पोलिसांवर दगडफेक करत असल्याचे समजते आहे. दरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठया प्रमाणात पोलिसांची कुमक बदलापूर स्टेशनमध्ये दाखल झाली होती. तसेच सध्या रेल्वे स्थानकासह शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात कारवाईला दिरंगाई करणाऱ्या तीन पोलिसांचे निलंबन करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी राज्य सरकार व पोलीस विभाग प्रयत्न करणार आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांचे देखील निलंबन करण्यात आले आहे. या घटनेचा तपास महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. यासाठी एसआयटी देखील स्थापन करण्यात आली आहे.