संग्रहित फोटो
कराड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकशाही व यशवंत विकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्यासह सर्व विजयी नगरसेवक उपस्थित होते.
पाटील म्हणाले, दोन्ही आघाड्यांचे संयुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले असून, आघाडीला एकूण २१ जागा मिळाल्या आहेत. तर १० जागा विरोधी गटाकडे गेल्या आहेत. अनेक वर्षे आपल्यासोबत कार्यरत असलेल्या काही सहकाऱ्यांना पराभव स्वीकारावा लागला, याची खंत असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना म्हणाले, पी. डी. पाटील साहेबांनी कराडच्या विकासाचा मजबूत पाया रचला. त्या पायावर उभे राहून कराडचा निश्चित विकास केला जाईल. ‘शांततामय सहजीवन’ या संकल्पनेनुसार सुसंवादी आणि सर्वसमावेशक विकासकामे केली जातील. कराड हे व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र असल्याने शहरातील शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता कायम राहील, या दृष्टीने दोन्ही आघाड्यांचे काम सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराडला यशवंतराव चव्हाण आणि पी. डी. पाटील साहेबांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्या विचारांवर आधारित विकासाचे भक्कम काम येथे उभे राहिले आहे. हाच विचार पुढे नेण्याचे काम आम्ही करणार आहोत.
यादव म्हणाले, आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, तसेच माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा आणि शांततामय सहजीवनाचा विचार घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो होतो, जनतेनेही त्याच विचारांना पसंती दिली आहे. हा निकाल म्हणजे जनतेने अपेक्षित असलेल्या विकासकामांसाठी दिलेला स्पष्ट कौल आहे. जनतेने दिलेली संधी आणि त्यांनी दाखवलेला विश्वास यास पात्र राहून कराडचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू, अशी ग्वाही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, कराडमध्ये गृहीतकांवर आधारित राजकारण जनतेने कधीही मान्य केलेले नाही. या निवडणुकीत जनतेनेच संपूर्ण प्रक्रिया आपल्या हातात घेतली होती. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळेल, याची आम्हाला खात्री होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ईव्हीएम व प्रशासनावर विश्वास
ईव्हीएम मशीनबाबत कोणतीही शंका नसल्याचे मत राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केले. आघाडीच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेतही प्रशासनावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगण्यात आले होते. कोणतीही गडबड होणार नाही, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. जनतेने लोकशाहीच्या उत्सवात आपले कर्तव्य पार पाडले, हाही विश्वासाचाच भाग असल्याचे ईव्हीएम संदर्भातील प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले. याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब पाटील यांनी, प्रत्येक प्रभागात वेगवेगळी ईव्हीएम यंत्रे होती. प्रत्येक ठिकाणी उमेदवार वेगळे होते आणि चिन्हांची मांडणीही खाली – वर होती. त्यामुळे या विषयावर अधिक काही बोलणे योग्य ठरणार नाही, असे सूचक वक्तव्य केले.






