लोणावळा : भांडणाची तक्रार देण्यासाठी आलेल्या जखमी फिर्यादीस चक्क पोलीस स्टेशन आवारात पुन्हा लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी केतन दिपक फाटक ( वय३०, रा. रचना गार्डन, लोणावळा ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी सचिन सदानंद घोणे आणि लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक मयूर अबणावे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केतन फाटक व सचिन घोणे यांच्यात दुपारी भांडण झाले होते. त्याच भांडणाची तक्रार देण्यासाठी फिर्यादी सचिन हे लोणावळा शहर पोलीस स्टेशनला आले होते. त्यावेळी त्यांना पाहून आरोपी केतन याने ठाणे अंमलदार कक्षातून बाहेर येऊन पोलीस स्टेशन आवारात फिर्यादी व त्याच्याबरोबर असणाऱ्यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात फिर्यादी यांच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला.
-पोलिसाला धक्का देऊन खाली पाडले
तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पोलीस नाईक हे सरकारी कर्मचारी असल्याची जाणीव असूनही आरोपीने त्यांना धक्का देऊन खाली पाडले. त्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.






