उंब्रज : वराडे (ता. कराड) येथील एका महिलेला दहा लाखांचा गंडा घालणाऱ्या मुख्य संशयितास उंब्रज पोलिसांनी कोल्हापूर येथून शिताफीने अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. रामकृष्ण बाबूराव देसाई (रा. आणे ता. कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वराडे (ता. कराड) येथील सुनंदा जालिंदर हजारे यांनी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तेव्हापासून पोलीस रामकृष्ण बाबूराव देसाई यांच्या मागावर होते. दरम्यान शनिवारी रात्री पावने अकरा वाजण्याच्या सुमारास गोकुळ शिरगाव, कोल्हापूर येथून उंब्रज पोलीसांनी संशयितास अटक केली. उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, काॅन्सटेबल संजय धुमाळ, मयुर थोरात यांनी कारवाई केली.
महिलेची १० लाख रुपयांची फसवणूक
पोलीसांनी सांगितले की, जमिनीवर बॅंकेचा व पतसंस्थेच्या कर्जाचा बोजा असतानाही त्याच जमिनीची मुदत खरेदी दस्त करून वराडेतील महिलेची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकीही फिर्यादी महिलेला दिली होती. याप्रकरणी फिर्यादीवरून रामकृष्ण बाबुराव देसाई (रा. आणे, ता. कराड) विमल मधुकर सुपनेकर (रा. हिंगनोळे, ता. कराड), हणमंत कारंडे (रा. उंब्रज) अशा तिघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. यातील एका संशयित याने फियादीचा विश्वास संपादन करून आणे गावच्या ह्दीतील गट नंबर ६३५ मधील सुमारे २१ गुठे जमिनीचे क्षेत्र मुदत खरेदी म्हणून घेण्यास भाग पाडले.
पैसे देण्यास टाळाटाळ
सुनंदा हजारेंनी आयडीबीआय बँकेच्या उंब्रज शाखेतील खात्यावरुन रामकृष्ण देसाई याला ३ लाख रुपये व त्यानंतर ४५ हजार रुपये आणि उवरित ६ लाख ५५ हजार रुपये रोख, असे मिळून सुमारे १० लाख रुपये दिले व मुदत खरेदीचा नोटरी रजिस्ट्र दस्त लिहून घेतला. सदरचा व्यवहार हा एक महिन्याच्या मुदतीवर ठरलेला होता. व्यवहाराबाबतची मुदत होऊन बरेच दिवस झाले. त्यामुळे फिर्यादी महिलेने रामकृष्ण देसाई याला वारंवार फोन करुन तसेच समक्ष भेट्रन पैसे मागितले, परंतु त्याने टाळाटाळ केली. त्यानंतर हा प्रकार फिर्यादीने जावई व मुलींना सांगितला. तसेच त्यांनी अधिक चौकशी केली असता मुदत खरेदी केलेल्या जमिनीवर एका पतसंस्थेचा व एका बँकेचा बोजा असल्याचे समजले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हजारे यांनी तिघांवर आपली संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुख्य संशयित रामकृष्ण देसाई हा फरार होता संशयितावर यापुर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडे होती. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी रामकृष्ण देसाई यास गोकुळ शिरगाव, कोल्हापूर येथून ताब्यात घेवून अटक केली. दरम्यान संशयितांकडून आणखी कोणाकोणाची फसवणूक झाली आहे, याची चौकशी करणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.