भाईंदर/ विजय काते : सध्या राज्यभरात मराठी विरुद्ध हिंदी भाषकांमधील तणावाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी मीरा-भाईंदरमध्ये मात्र वेगळंच चित्र दिसत आहे. भाईंदरमध्ये शेकडोच्या संख्येने हिंदी भाषिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) प्रवेश करून सामाजिक ऐक्याचा एक अनोखा संदेश दिला आहे. विशेष बाब म्हणजे या पक्षप्रवेशात मुख्यतः वाहतूक विभागाशी संबंधित कर्मचारी आणि गोरक्षकांचा समावेश आहे.हा भव्य पक्षप्रवेश सोहळा घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या पायथ्याशी पार पडला. मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाच्या वेळी बोलताना अविनाश जाधव यांनी आपल्याच विशिष्ट शैलीत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “सदावर्ते कुठेही भेटले, तर त्यांचा चष्मा काढून थेट त्यांच्या गुडघ्यावर ठेवीन,” असा इशाराच त्यांनी दिला. हे वक्तव्य करताना उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सदावर्ते हे सतत राज ठाकरे आणि मनसेवर टीका करत असल्याने जाधव यांनी त्यांना “मराठी अस्मितेचा शत्रू” ठरवत जाहीर प्रत्युत्तर दिले आहे.
या वेळी जाधव यांनी 5 जुलै रोजी मराठी भाषेसाठी आयोजित केलेल्या आंदोलनाबाबतही माहिती दिली. “ही लढाई फक्त भाषेची नाही, तर मातृभूमीवरील प्रेमाची आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या आंदोलनात सहभागी व्हावे. ही चळवळ ‘भूतो ना भविष्यति’ ठरेल असा निर्धार आम्ही केला आहे,” असे ठाम विधान त्यांनी केले.तसेच, “सरकारने जर मराठी भाषेला डावलण्याचा प्रयत्न केला, तर मनसे त्याला धडा शिकवेल,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
या कार्यक्रमामुळे मनसेला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा आहे. विशेषतः हिंदी भाषिकांचा सहभाग हे महाराष्ट्रातील राजकारणात एक मोठे आश्चर्य मानले जात आहे. हिंदी भाषिक मतदारांचा ओढा मनसेकडे वळत असल्यास, आगामी निवडणुकांमध्ये त्याचा मोठा राजकीय परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तुळातून व्यक्त होत आहे.या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने मनसेने एकीकडे मराठी अस्मितेचा झेंडा उंचावला आहे, तर दुसरीकडे हिंदी भाषिकांच्या सहभागामुळे सामाजिक सलोख्याचं उदाहरणही घालून दिलं आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमधील हा उपक्रम राज्यातील राजकीय वातावरणात एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.