शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. भगत यांच्या प्रभागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन शिव जयंतीच्या मुहूर्तावर सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. सोमवारी होणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्या निमित्त कळंबोली गाव येथील श्री काळभैरव मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजेच्या सुमारास आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेवक भगत यांनी नागरिकांना केले आहे.
आयुक्त देशमुख आणि इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार असलेल्या भूमी पूजन सोहळ्या दरम्यान अमृत योजने अंतर्गत कळंबोली गावातील जळकुंभ उभारणीचे भूमिपूजन, पाण्याची नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन, शिवरेज लाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच इतर विविध विकास कामे करण्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक भगत यांनी दिली आहे. 2016 साली पनवेल पालिकेसाठी झालेल्या पहिल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या रवींद्र भगत यांनी प्रभागाच्या विकासासाठी पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी विविध प्रकारच्या आंदोलनाद्वारे आता पर्यत यशस्वी पाठपुरावा केला आहे. म्हणूनच विरोधी पक्षाचे नगरसेवक असून देखील भगत यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे करून घेण्यात भगत यांना यश आले असल्याचे मत प्रभागातील नागरिक व्यक्त करत आहेत.