मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेत आल्यानंतर विविध निर्णय घेतले जात आहेत. त्यानंतर आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) अभ्यासक्रम लागू होणार होता. मात्र, आता हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू केला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे MPSC च्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय जरी घेतला असला तरी भाजपने याचं व्यवस्थित श्रेय घेतले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्रशासकीय पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवार शासकीय सेवेत घेतला जातो. पण याचा अभ्यासक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर घेण्यात येणार होता. याला अनेक विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केला होता. राज्यातील विविध ठिकाणी निदर्शने, आंदोलनेही झाली. त्यानंतर आता हा नवा अभ्यासक्रम 2025 च्या वर्षापासून लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली. अशाप्रकारचा निर्णय घेत भाजपने श्रेय घेण्याचे काम केले आहे. पण याचा निर्णयाचा लाभ आगामी निवडणुकांत होणार का हे पाहणे गरजेचे आहे.
पुण्यात झाले होते आंदोलन
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. यूपीएससीच्या (UPSC) धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो 2025 पासून लागू करावा, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी एकत्र आले होते. अलका टॉकीज चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी 13 जानेवारीला देखील आंदोलन केले होते.