रत्नागिरी : बारसू रिफायनरीचा (Barsu Refinery) मुद्दा पेटत आहे. बारसू रिफायनरीच्या विरोधात आंदोलनही सुरू आहे. या मुद्यावरून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात (Barsu Refinery Project) असलेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी बारसूत दाखल झाले असून, त्यांनी भेटही घेतली आहे. त्यानंतर बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि निलेश राणे (Nilesh Rane) हे समर्थकांसह बारसूत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला केला. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख दलाल म्हणून केला आहे.
बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या रिफायनरीला विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘प्रदूषणकारी रिफायनरी कोकणात नकोच’, अशी ठाम भूमिका ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतली आहे. त्यावर आता नितेश राणे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘राज्यातील सर्वात मोठा दलाल आज बारसूत आला आहे. उद्धव ठाकरेंना ‘जन की बात’ नाही तर ‘धन की बात’ कळते. महाराष्ट्र पेटवण्यापेक्षा लोकांच्या चुली पेटवा. मातोश्रीवर खोके पोहोचावेत यासाठीच बारसूला विरोध सुरू आहे. उद्धव ठाकरेंची भूमिका विकासविरोधी आहे. कोकणातील जनतेचा विकास त्यांना नको.’
‘जन की बात’ ऐकायला आलोय : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे हे सध्या बारसूत दाखल झाले असून, त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं की, हा रिफायनरी प्रकल्प कोकणात नको, गुजरातेत न्या. ‘प्रदूषणकारी रिफायनरी कोकणात नकोच. बारसूत रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या आंदोलकांची ठाकरेंनी भेट घेतली. त्यावेळी आपण ‘जन की बात’ ऐकायला आलेलो आहोत, ‘मन की बात’ ऐकायला आलेलो नाही, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला.