नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशी (SIT Enquiry) करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. या सरकारला एसआयटी स्थापन करण्याची खाज आहे. खोकेवाल्यांचीही एसआयटी चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, भाजपच्या (BJP Mla) आमदारांनी स्वत:ची वक्तव्ये काढून पाहावीत. हे दुतोंडी साप आहेत. दोन्ही बाजूने वळवळत आहेत. वळवळू द्या, अशी टीकाही त्यांनी केली.
राज्य सरकारने एसआयटीचे रेशनिंग (Rationing) केले आहे. मागेल त्याला एसआयटी देण्यात येत आहे. महाराष्ट्रात एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे. जे ४० आमदार ज्या पद्धतीने ५० खोके देऊन फोडण्यात आले. तो काय व्यवहार होता याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. पण जे विषय संपले आहेत. जे विषय पोलीस आणि सीबीआयने संपवले आहेत, त्यावर एसआयटी स्थापन करून सत्तेचा आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. आम्ही सर्व तपासाला सामोरे जाऊ. तुम्ही तोंडावर पडाल, असा इशाराच राऊतांनी दिला.
सरकारपक्षातील अनेकांची प्रकरणे बाहेर पडली. त्याचाही तपास होईल. आम्ही दोन दिवस नागपूरला जात आहोत. अनेक प्रकरणे काढू. त्यावरही एसआयटी मागू. या सरकारला एसआयटी स्थापन करण्याची खाज आहे. खाजवत बसा, असा हल्ला राउतांनी चढवला. एसआयटी ही अत्यंत महत्त्वाच्या अन्यनसाधारण प्रकरणात स्थापन केली जाते. पण सरकारने एसआयटी आणि पोलिसांचे महत्त्व कमी केले आहे. ऊठसूठ एसआयटी स्थापन करायची, पोलिसांना काही कामच ठेवले नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
जे विषय संपले त्यावर पुन्हा पुन्हा बोलायचे. विधानसभेत कोणीही उठतो आणि एसआयटीची मागणी करतो. दुसऱ्यांची अप्रतिष्ठा करण्याचे विषय काढले जात आहेत. बदनामीचे शस्त्र बाहेर काढले जात आहे. पण आम्ही त्यातून बाहेर पडू. हे अग्निदिव्य आहे. अशा अनेक अग्निदिव्यातून शिवसेना तावून सलाखून बाहेर पडलेली आहे. शिवसेनेने महाराष्ट्र प्रकाशमान केला आहे. अशा प्रकाराने शिवसैनिकांचे मनोधैर्य खच्ची होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
मॉलमधून वाईन विकण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली होती. तो निर्णय द्राक्ष उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या हिताचा होता. तेव्हा सरकार मद्य धोरणाला पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात आला. आज तेच धोरण सरकार आणत आहे. नाईट लाईफला विरोध करणारे आशिष शेलार आज कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला. भाजपच्या आमदारांनी स्वत:ची वक्तव्ये काढून पाहावीत. हे दुतोंडी साप आहेत. दोन्ही बाजूने वळवळत आहेत. वळवळू द्या, अशी टीकाही त्यांनी केली.