भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून हीललाईन पोलीस ठाण्यात शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर कल्याण पूर्वेत तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेनंतर महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ कल्याण पूर्वत बॅनर लावण्यात आले. तर दुसरीकडे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीशी कल्याण पूर्व येथील भाजप पदाधिकारी ठामपणे असल्याचे सांगण्यात आले. भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठकीबाबत दुजोरा दिला आहे.
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ कल्याण पूर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होऊ नये यासाठी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहण्याचा ठामपणे निर्णय घेतल्याची माहीती समोर आली आहे. दरम्यान याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ही बैठक संघटनात्मक होती, कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण होऊ नये, पक्षाचे विविध कार्यक्रम राबवले जावेत यासाठी होती. या बैठकीत संघटनात्मक कार्यक्रम राबवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीशी कल्याण पूर्वतील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते ठामपणे उभे राहणार असल्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीच्या संदर्भातील माहिती पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांनी दिली. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. एकंदरीतच गोळीबाराच्या घटनेनंतर महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ महेश गायकवाड समर्थकांनी बॅनर लावले. तर दुसरीकडे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना समर्थन देण्यासाठी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहेत. त्यामुळे कल्याण पूर्वेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील धुसफूस काही थांबताना दिसत नाही. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थाचा सोशल मीडियावर एक मेसेज देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गणपत गायकवाड यांना समर्थन देण्यात आले आहे.