मुंबई : चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या (चिंचपोकळीचा चिंतामणी, Chinchpoklicha Chintamani) वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे प्रणेते युगपुरूष लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आज (दि.३१ जुलै २०२२) रोजी रक्तदान शिबिराचे (Blood Donation Drive) आयोजन नायर हॉस्पिटल (Nair Hospital), रक्तपेढी व वाडीया रूग्णालय, रक्तपेढी (Wadia Hospital Blood Bank) तसेच सिव्हिल रूग्णालय ठाणे (Civil Hospital, Thane) आणि सर जे जे महानगर रक्तपेढी (Sir JJ Mahanagar Blood Bank) यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

या रक्तदान शिबिरात ८८० रक्तदात्यांनी आगाऊ नाव नोंदणी केली होती. रक्तदान शिबीरात नायर हॉस्पिटल, रक्तपेढीसाठी ३४४, वाडीया रूग्णालय, रक्तपेढीसाठी २०० तसेच सिव्हिल रूग्णालय ठाणेसाठी १३६ आणि सर जे जे महानगर रक्तपेढीसाठी २२० अशा एकूण तब्बल ९०० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. मंडळाच्या वतीने रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक, मानदसचिव वासुदेव सावंत, कोषाध्यक्ष अतुल केरकर यांच्यासह महेश पेडणेकर तसेच विद्याधर घाडी यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकारिणी सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या सहायक सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.






