पुणे : यंदा दरवर्षीपेक्षा कमी तीव्रतेने पाऊस पडला आहे. असे असतानाही आंबेगाव पठार ,आंबेगाव गावठाण, दत्तनगर चौक, धनकवडी परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शिवाय त्या रस्त्यात मोठ्याप्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यांहून वाहने तर सोडाच पण नागरिकांनीही नीट चालता येत नाही. संबंधित खड्डेबुजविणे संदर्भात धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय येथे अर्ज करण्यात आला तरीही त्याची दखल न घेतल्याने रस्त्यावरील खड्ड्यात होडी सोडून आंदोलन केले असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्ष पुणे शहर अध्यक्ष बालाजी पवार यांनी दिली.
पुणे शहरात संततधार पावसामुळे परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे परिसरातील शाळकरी जेष्ठ नागरिकांसह महिला आणि नोकरदार वर्गाला याचा रोज त्रास सहन करावा लागतो आहे. संबंधित प्रश्नासाठी पवार यांनी वारंवार पालिका कार्यालयात पाठपुरावा केला असतानाही त्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आंबेगाव पठार येथे रस्त्यावर साठलेल्या पाण्यात होडी सोडून आंदोलन केले.
यावेळी रासपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव माऊली सलगर, युवक आघाडीचे अजित पाटील, गणेश लोंढे, अंकुश देवडकर, राजेश लवटे, वैजनाथ स्वामी, नारायण यमगर, नामदेव सुळे, अशोक कारंडे, दीपाली परदेशी, वर्षा कोळी वर्षा ठक्कर, श्याम मिसाळ, श्रीकांत हांडेबाग,आकाश पवार, सौरभ लोंढे आदी उपस्थित होते.