शनिवारवाडा ते स्वारगेट भूमिगत रस्त्याला 'ब्रेक';
पुणे / दीपक मुनोत : पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित शनिवारवाडा ते स्वारगेट (छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्ता) या भूमिगत रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात असतानाच कामाला ब्रेक बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ज्या विभागाच्या अखत्यारित रस्ता येतो, त्यांनीच त्याचे डीपीआर व काम करावे’, अशा सूचना दिल्यानंतर बांधकाम विभागाने हात काढून घेतला.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून या भूमिगत रस्त्याचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू होते आणि लवकरच अहवाल सादर होणार होता. मात्र, आता या रस्त्याचे डीपीआर व पुढील विकासकामे पुणे महापालिकेलाच करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाला पुन्हा नव्याने डीपीआर तयार करण्याची गरज भासणार असून, त्यातून कामात आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले जाणार
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले जाईल. मात्र, तत्पूर्वी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहोत. यात आवश्यक ती चर्चा होऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
– नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका
पुणे महापालिका करणार रस्त्याचे काम
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर शनिवारवाडा ते स्वारगेट व बाजीराव रस्त्यावरील सारसबाग ते शनिवार वाडा भूमिगत रस्त्याचे डीपीआरच्या काम सुरु होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आता या रस्त्याचे काम पुणे महापालिका करणार आहे.
हेदेखील वाचा : Thane News : आरोग्यसेवा होणार ऑनलाईन; प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी टॅबचे वितरण