फोटो सौजन्य - Social Media
Childline 1098 आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त प्रयत्नांतून बुलढाणा जिल्ह्यात मागील एका महिन्यात तब्बल २४ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. महिला व बाल विकास विभागांतर्गत ही मोहीम राबविण्यात आली असून विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून बालविवाह प्रतिबंधासाठी प्रभावी कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात बालविवाहाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अॅक्शन मोडमध्ये काम करत तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
चाइल्ड हेल्पलाईन १०९८ बुलढाणा येथे प्राप्त झालेल्या २४ तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बालकल्याण समितीचे अध्यक्ष मनोज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. बालविवाह रोखण्यासाठी पोलिस विभाग, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्रामपातळीवरील समित्या आणि अंगणवाडी यंत्रणांचा समन्वय साधण्यात आला. या मोहिमेत चाइल्ड हेल्पलाईन टीममधील प्रकल्प समन्वयक शेख, समुपदेशक विद्या खरे, पर्यवेक्षक सागर नरवाडे, केस वर्कर प्रवीण गवई, मुकेश मोरे आणि राहुल सुरडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संबंधित गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामसेवक, अंगणवाडी सुपरवायझर आणि पोलिस स्टेशन यांच्याशी समन्वय साधत संभाव्य बालविवाह थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
प्राप्त तक्रारीनंतर चाइल्ड हेल्पलाईनची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर संबंधित पोलिस स्टेशन, पोलिस हेल्पलाईन ११२, ग्रामीण व शहरी भागातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तसेच अंगणवाडी सेविकांच्या मदतीने संबंधित बालिकांचे विवाह थांबविण्यात आले. पुढील कायदेशीर आणि संरक्षणात्मक कार्यवाहीसाठी संबंधित बालिकांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. बालकल्याण समितीने संबंधित बालिकांची मुलाखत घेत चौकशी केली. काही गंभीर प्रकरणांमध्ये बालिकांची रवानगी शासकीय बालिका गृह, बुलढाणा येथे करण्यात आली. समुपदेशक शारदा पवार आणि विद्या खरे यांनी बालिकांचे समुपदेशन करत बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली. तसेच शिक्षणाचे महत्त्व, बालविवाहाचे दुष्परिणाम आणि स्वावलंबन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तालुकानिहाय पाहता चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, मोताळा, बुलढाणा, मलकापूर आणि खामगाव या भागांमध्ये सर्वाधिक बालविवाह रोखण्यात आले. प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित १०९८ या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगितले आहे. महिला व बाल विकास विभागाने बालविवाह रोखण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे अनेक बालिकांचे भविष्य सुरक्षित झाले असून शिक्षण आणि स्वावलंबनाकडे त्यांची वाटचाल सुरू राहणार आहे. प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रभावी जनजागृती निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.






