सरन्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘खेळाडू आणि संघटना यांच्यातील सुरू असलेल्या वादाचा खेळावर परिणाम होऊ नये. कोणतेही मतभेद असले तरी, कुस्ती आणि खेळाडूंचे हित सर्वोपरि असले पाहिजे.’ सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने WFI च्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली आणि विचारले की, ‘पूर्वी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दिलासा देण्यात यायचा, मग विनेशच्या प्रकरणात वेगळे नियम का?’. न्यायालयाने मान्य केले की विनेश फोगाट सध्या प्रसूती रजेवर आहे. परंतु, खेळाडूंच्या वैयक्तिक परिस्थितीचा तसेच खेळाच्या आणि देशाच्या हिताचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
न्यायालयाने सांगितले की, ‘या देशात मातृत्वाचा आदर केला जातो आणि कोणत्याही क्रिडा संघटनेने सूडाच्या भावनेतून कारवाई करू नये.’ न्यायालयाने, केंद्र सरकारला विनेश फोगाटच्या तंदुरुस्तीचे आणि स्पर्धेत परत येण्याचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती तातडीने स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांच्या ट्रायलमध्ये विनेशला सहभागी होण्याची संधी दिली पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
भारतीय कुस्ती महासंघने विनेश फोगाटला जून २०२६ पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी अपात्र घोषित केले होते. महासंघाच्या म्हणण्यानुसार, निवृत्तीनंतर पुनरागमन करताना युनायटेड वर्ल्ड रेसलिंग [ United World Wrestling (UWW)] आणि इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सी [International Testing Agency (ITA)] यांच्या अँटी-डोपिंग नियमांनुसार खेळाडूंना सहा महिन्यांची पूर्वसूचना देणे आवश्यक असते. यानंतर विनेशने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून WFI चा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.
१८ मे रोजी उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने विनेश फोगाटला ३० आणि ३१ मे रोजी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. दरम्यान,WFI ने अलीकडेच विनेशला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तिला जून २०२६ पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेण्यास अपात्र ठरवले होते. विनेशने या नोटीसला आव्हान दिले होते, ज्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिलांच्या ५० किलो गटाच्या अंतिम फेरीपूर्वी वजन निकष पूर्ण न झाल्याने विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर तिने निवृत्ती जाहीर केली होती. मात्र डिसेंबर २०२५ मध्ये तिने लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी पुनरागमनाची घोषणा केली.
RCB vs SRH: कर्णधार रजत पाटीदार SRH विरुद्ध खेळण्यास सज्ज? समोर आली मोठी अपडेट






