Pune Fire News : पुणे : पुण्यामध्ये आगीची भीषण घटना घडली आहे. काल रात्री ही आगीची घटना घडली आहे. बंडगार्डन रस्त्यावरील टीव्हीएस शोरुममध्ये भीषण आगीची घटना घडली. यामध्ये गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काल (दि. २५ ऑगस्ट) रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अग्निशमन दल नियंत्रण कक्षात याबाबत कॉल आला. सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागल्यामुळे जवळपास 60 गाड्या या आगीमध्ये जळून खाक झाल्या आहेत.
बंडगार्डन रस्त्यावर ताराबाग या तीन मजली इमारतीमध्ये तळमजल्यावर टिव्हीएस कंपनीचे शोरूम व सर्व्हिस सेंटर होते. या सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागल्याची घटना घडली. या शोमध्ये असणाऱ्या दुचाकींना आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाकडून नायडू व येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहन व मुख्यालयातील वॉटर टँकर तातडीने रवाना करण्यात आला होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवत मोठी दुर्घटना टळली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
घटनास्थळी पोहचताच अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहिले की, तीन मजली इमारतीत तळमजल्यावर टिव्हीएस कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या आगीचे स्वरुप देखील मोठे असल्यामुळे धुरांचे लोट आसपासच्या परिसरामध्ये पसरले होते. या आगीमध्ये दुचाकी वाहने पेटल्याने प्रचंड धूर निर्माण झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रथम आतमध्ये कोणी अडकल्याची खात्री करण्यात आली. यावेळी एक व्यक्ती धुरामुळे अडकल्याचे समजताच जवानांनी त्याला युद्धपातळीवर सुखरूप बाहेर काढले.
बंडगार्डन टीव्हीएस शोरुमला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे (फोटो – टीम नवराष्ट्र)
यानंतर आग लागलेल्या सर्व ठिकाणी पाण्याचा मारा सुरु केला. धूर जास्त प्रमाणात असल्याने श्वसन यंत्र परिधान करीत सुमारे तीस मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आली. कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले. या घटनेत इलेक्ट्रिक व पेट्रोल अशा एकूण ६० दुचाकी जळाल्या आहेत. यामध्ये गाड्यांचे फक्त काही अवशेष राहिले असल्याचे दिसून येत आहे. आगीमध्ये जळालेल्या वाहनांमध्ये काही नवीन तर काही दुरुस्ती करिता आलेल्या दुचाकी असल्याचे समजले. सदर ठिकाणी इलेक्ट्रिक वायरिंग, यंत्र सामुग्री, बॅटरी, वाहनांचे सुटे भाग, संगणक, सोफा, एसी, टेबलखुर्च्या, कागदपञे देखील आगीत जळाली आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गाडीच्या शोरुमध्ये आग लागल्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झाले आहे. इलेक्ट्रिक गाड्या देखील असल्यामुळे आगीची भीषणता वाढली. मात्र या आगीचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आपले कार्य वेळेत पार पाडत पुढील धोका टाळला. यावेळी महावितरण कर्मचारीवर्ग व पोलिस उपस्थित होते. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी यावर हळहळ व्यक्त केली आहे.