महालक्ष्मी दर्शनासाठी निघालेल्या कारचा मंगळवेढ्याजवळ भीषण अपघात; हैद्राबाद येथील दाम्पत्य... (Photo : Solapur Accident)
मंगळवेढा : सोलापूर-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर हैद्राबाद येथील एक कुटुंब महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कारमधून जात होते. त्याचदरम्यान, कारच्या आडवे कुत्रे आल्याने कारने तीन ते चारवेळा पलटी मारली. संबंधित कार ही रोडच्या खाली गेल्याची घटना घडली. हा अपघात सुगरण हॉटेलजवळ घडला. दरम्यान, या अपघातामध्ये महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघालेले पती-पत्नी बालंबाल बचावले.
रवीकुमार दिनवही (वय 56) हे वित्त मंत्रालयात नोकरीस असून, सध्या ते हैद्राबाद येथे निवासी आहेत. 2 मे रोजी सकाळी 6.45 वाजता ते व त्यांच्या पत्नी जयश्री असे दोघेजण कार (टी.एस.08 एफ.डी.1818) या गाडीने कोल्हापूर येथील महालक्ष्मी दर्शनाच्या निमित्ताने जात होते. त्यावेळी सोलापूर-कोल्हापूर या राष्ट्रीय महामर्गावरील मंगळवेढाजवळ असलेल्या सुगरण हॉटेलजवळ रस्त्यावर एक कुत्रा अचानक आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार डाव्या बाजूस शेतामध्ये जाऊन पलटी झाली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, या गाडीने तीन ते चारवेळा पलटी मारल्याने महामार्गावरुन जाणार्या लोकांनी धावत येऊन त्या पती-पत्नींना बाहेर काढण्यास मदत केली. तसेच इंचगाव टोलनाका येथे कॉल करुन अॅब्ल्युलन्स व कर्मचारी बोलावून रोडच्या खाली गेलेली कार वर काढण्यात आली.
दाम्पत्याला कोणतीही दुखापत नाही
कारने चार पलट्या मारुनही पती-पत्नी नशीबाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याने सदर कार चालकाने देवाचे आभार मानले. याची खबर कारचालकाने पोलिसांत दिली. या अपघाताचा अधिक तपास मंगळवेढा शहरचे पोलीस नाईक कृष्णा जाधव हे करत आहेत.
महिला मजुरांच्या वाहनाला अपघात
दुसऱ्या एका घटनेत, बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, 15 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात बीड-अहिल्यानगर महामार्गावरील धामणगाव परिसरात काही दिवसांपूर्वीच झाला होता.