Chandrapur News: ई-पीक पाहणीसाठी सहायकांची नियुक्ती वादात! स्थानिक तरुणांना डावलल्याचा आरोप, चौकशीची मागणी
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ई-पीक सहायक म्हणून गावचे कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानातील स्वयंसेवक, सीएससी (आपले सरकार सेवा केंद्र) चालक तसेच इतर स्थानिक पात्र व्यक्ती यांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
प्रत्येक सुमारे १ हजार ५०० ओनर्स प्लॉटमागे एक सहायक नेमण्याची जबाबदारी तहसीलदारांमार्फत पार पाडली जाते आणि नियुक्ती तलाठ्यांच्या लॉगिनद्वारे केली जाते. मात्र, संबंधित गावात अनेक सुशिक्षित व बेरोजगार युवक उपलब्ध असतानाही त्यांना कोणतीही संधी न देता तलाठ्यांनी त्यांच्या जवळील बाहेरगावच्या व्यक्तीची सहायक म्हणून नोंदणी केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया नेमक्या कोणत्या निकषांवर झाली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासनाचा उद्देश स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा असताना प्रत्यक्षात मनमानी पद्धतीने बाहेरगावच्या व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यामुळे पात्र स्थानिक युवकांवर अन्याय झाला असून संपूर्ण नियुक्ती प्रक्रियेची चौकशी करून निकष सार्वजनिक करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. पात्र स्थानिक तरुणांना प्राधान्य देत पारदर्शक पद्धतीने सहायकांची नियुक्ती करावी. ई-पीक पाहणी ही पीकविमा, पीक आधारित अनुदान, नैसर्गिक आपत्ती मदत तसेच विविध कृषी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. सहायकाला शेताच्या २० मीटरच्या आत जाऊन मोबाइलद्वारे पिकांची नोंद करावी लागते. एकल पिकासाठी १० रुपये, तर मिश्र पिकासाठी १२ रुपये प्रतीओनर्स प्लॉट असे मानधन कृषी विभागाकडून दिले जाणार आहे.
गावात अनेक सुशिक्षित आणि पात्र बेरोजगार तरुण असताना बाहेरील नागरिकांना प्राधान्य देणे ही बाब निश्चितच खेदजनक आहे. स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याऐवजी बाहेरील व्यक्तींना संधी देणे हा स्थानिकांवर अन्याय आहे. यामागे हेतुपुरस्सर स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न होत आहे. प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्थानिक पात्र तरुणांना प्रथम प्राधान्य द्यावे.
ई-पीक पाहणीसाठी सहायकांची नियुक्ती शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येते. संबंधित गावात पात्र व इच्छुक स्थानिक व्यक्त्ती उपलब्ध असल्यास त्यांनाच प्राधान्य दिले जाते. मात्र, जर गावात इच्छुक किंवा उपलब्ध पात्र व्यक्ती नसतील, तर कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार बाहेरील पात्र व्यक्तीचीही सहायक म्हणून नियुक्ती करता येते. नियुक्ती ही गरज व पात्रतेच्या निकषांवर केली जाते. – लीना बोबाटे, नायब तहसीलदार, ब्रह्मपुरी.






